स्लॅब दुर्घटनेत 1 विद्यार्थी दगावला तर 12 जखमी
- by Aajchi Navi Mumbai
- Mar 07, 2026
- 27
नवी मुंबई : कोपरखैरणे सेक्टर 2 येथील विद्या भवन सोसायटीमध्ये सुरू असलेल्या घरगुती शिकवणी वर्गावर गुरुवारी सायंकाळी पहिल्या मजल्यावरील स्लॅब अचानक कोसळल्याने भीषण दुर्घटना घडली. या दुर्घटनेत ढिगाऱ्याखाली अडकलेल्या 12 विद्यार्थी आणि एका शिक्षिकेला अग्निशमन दलाने बाहेर काढले. मात्र उपचारादरम्यान मनीष म्हसे (वय 13) या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला.
ही घटना गुरुवारी सायंकाळी सुमारे 5.20 वाजण्याच्या सुमारास कोपरखैरणे सेक्टर 2 मधील प्लॉट क्रमांक 12 वरील विद्या भवन सोसायटीत घडली. तळमजल्यावर घरगुती शिकवणी वर्ग सुरू असताना पहिल्या मजल्यावरील स्लॅबचा काही भाग अचानक कोसळून खाली पडला. घटनेची माहिती मिळताच वाशी, कोपरखैरणे आणि ऐरोली येथील अग्निशमन दलाच्या गाड्या तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या. जवानांनी तातडीने बचावकार्य सुरू करत मलब्याखाली अडकलेल्या विद्यार्थ्यांचा शोध घेतला. काही वेळ चाललेल्या बचाव मोहिमेनंतर 12 विद्यार्थी आणि एक शिक्षिका अशा 13 जणांना बाहेर काढण्यात आले. जखमी विद्यार्थ्यांना तातडीने जवळील रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले. त्यापैकी मनीष म्हसे या 13 वर्षीय विद्यार्थ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, अशी माहिती आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी दिली. इतर विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले.
घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली. मोठा आवाज ऐकून स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत अग्निशमन दलाच्या जवानांना मदत केली. काही काळ परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, संबंधित इमारत सुमारे 1998 साली बांधण्यात आली असून सोसायटीमध्ये एकूण 16 कुटुंबे वास्तव्यास आहेत. दुर्घटनेनंतर खबरदारीचा उपाय म्हणून इमारतीतील रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे.
नवी मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या माहितीनुसार शहरात सध्या सुमारे 65 इमारती धोकादायक असल्याची नोंद आहे. या दुर्घटनेनंतर जुन्या इमारतींच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. स्लॅब कोसळण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून इमारतीच्या संरचनात्मक स्थितीची तपासणी करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने सांगितले.
- बचाव करण्यात आलेल्यांची नावे
सिद्धांत गुप्ता (8), प्रिन्स सोनी (11), आयशा खान (11), कुलसुम खान (15), निष्का धनवाडे (14), मनीष म्हसे (13), आराध्या बोडसे (14), तन्वी श्रीवास्तव (7), देवांश पुजारी (12), राजदीप वानखेडे (10), पार्थ खैरनार (14), रुद्र येलूरकर (5) आणि शिक्षिका शामली चौधरी (53). - शिवसेना उपचाराचा खर्च उचलणार
जखमी विद्यार्थ्यांच्या संपुर्ण उपचाराचा खर्च शिवसेना करणार असून मयत विद्यार्थ्याच्या कुटुंबियांना 5 लाखांची आर्थिक मदत करणार असल्याचेशिवसेना विरोधीपक्षनेते विजय चौगुले यांनी सांगितले.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai