जागतिक महिला दिन नवी मुंबईत उत्साहात साजरा
- by Aajchi Navi Mumbai
- Mar 09, 2026
- 24
नवी मुंबई ः ‘महिलांनी स्वप्न बघा, ती स्वप्न प्रत्यक्षात उतरविण्यासाठी कार्यरत रहा आणि समोर आलेल्या अडचणींचे संधीत रूपांतर करण्यासाठी सज्ज रहा’, अशा शब्दात नवी मुंबईच्या महापौर सुजाता पाटील यांनी शुभेच्छा दिल्या. नवी मुंबई महापालिका महिला व बालकल्याण समितीच्या वतीने वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृह येथे आयोजित विशेष समारंभानिमित्त त्या आपले मनोगत व्यक्त करीत होत्या.
आज जीवनाच्या सर्वच क्षेत्रात महिला आघाडीवर असून त्यांचे आर्थिकदृष्ट्या सबलीकरण करण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने यापुढील काळात विविध उपक्रम राबविण्याचे नियोजन असल्याचे त्यांनी सांगितले. विशेषत्वाने एनएमएमटी परिवहन उपक्रमात महिला चालक असावेत यादृष्टीने त्यांना प्रशिक्षण देऊन कामाची संधी उपलब्ध करून देण्यात येईल अशी भूमिका महापौरांनी मांडली. बेलापूर विधानसभा सदस्य आ.मंदाताई म्हात्रे यांनी स्त्री म्हणजे प्रेमाचा अथांग सागर असे सांगत कुटुंब व समाजातील स्त्रीचे महत्व अधोरेखित केले. आज महिलांनी प्रत्येक क्षेत्रात नाव मिळविले आहे. तिच्या कर्तृत्वाला योग्य संधी उपलब्ध करून देण्यासाठी महापालिकेने पुढाकार घ्यावा व स्त्रियांनी निर्मिलेल्या वस्तुंना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी ठोस उपाययोजना करावी असे सांगितले. महापालिकेच्या निधीचा योग विनियोग करून योजनांचा लाभ सर्वांपर्यंत पोहचविण्यासाठी अधिक गतीमान प्रयत्न करावेत असे त्यांनी सांगितले. उपमहापौर दशरथ भगत यांनी दिलखुलास शैलीत नारीशक्तीला नमन करून मनोगताची सुरूवात केली व यापुढील काळात सर्व नगरसेवकांच्या माध्यमातून योजनांची जास्तीत जास्त अंमलबजावणी करण्यावर गतीमान भर देण्यात येईल असे सांगितले.
अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार यांनी आता सभागृह अस्तित्वात आल्याने लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून जास्तीत जास्त महिलांपर्यंत योजनांची माहिती पोहचविली जाईल असे सांगत यापुढील काळात नवी मुंबईतील विमानतळ, डाटा सेंटर याठिकाणच्या नोकरीकरिता आवश्यक प्रशिक्षण देऊन रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घेतला जाईल असे प्रतिपादन केले. महिला व बालकल्याण समितीच्या सभापती सलुजा सुतार यांनी प्रास्ताविकपर मनोगतात महिला व बालकल्याण समितीमार्फत विविध 25 प्रकारच्या योजना राबविल्या जात असल्याची माहिती देत महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तुंसाठी विक्री केंद्र उपलब्ध करून देण्यासाठी ठोस प्रयत्न केले जातील असे सांगितले. या आर्थिक वर्षात 9500 हून अधिक लाभार्थ्यांनी वैयक्तिक लाभाच्या योजनांचा तसेच 25758 विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीच्या योजनेचा लाभ घेतला असल्याची माहिती त्यांनी दिली.
यावेळी घणसोली येथे हॉटेल राधाराणी थाळी घर च्या संचालक मंदा भिवसेन उंडे यांना महिला उद्योजकता पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात आले. तसेच स्वच्छता अभियानात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या स्वयंसेवी संस्था / बचत गट यांना देण्यात येणारा विशेष पुरस्कार नुतन सहकारी सेवा संस्था, कोपरखैरणे यांना प्रदान करण्यात आला यासोबतच 8 प्रशासकीय विभागातील 8 उत्कृष्ट आशा सेविका आणि 8 महिला स्वच्छताकर्मींचा विशेष सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे स्नेहा राजेंद्र घोरपडे यांना उत्कृष्ट महिला पोलीस कर्मचारी, नेहा विलास मनुचारी यांना उत्कृष्ट प्राथमिक शिक्षिका व विजया ठाकूर यांना उत्कृष्ट माध्यमिक शिक्षिका म्हणून गौरविण्यात आले.
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून घेण्यात आलेल्या समुहगायन, भजन, मंगळागौर, समुहनृत्य, समुह नाटिका, शॉर्ट व्हिडीओ स्पर्धांचा पारितोषिक वितरण सोहळा या कार्यक्रमात संपन्न झाला. यावेळी गायन स्पर्धा परीक्षक चित्रा बाविस्कर, प्रिया चांदुरकर, तन्वी गोरे तसेच समुहनृत्य स्पर्धा परीक्षक सचिन पवार, कल्पिता राणे, आदित्य हळबे, विलास चव्हाण आदी परीक्षकांना सन्मानीत करण्यात आले. विशेष पैठणी ड्रॉ मधील विजेत्या आठ विभागातील प्रत्येकी एक महिलेस मानाची पैठणी देऊन सन्मानीत करण्यात आले. याप्रसंगी महिला बचत गट व महिला मंडळे यांनी उत्पादित केलेल्या साहित्य वस्तूंचे स्टॉल्स लावण्यात आले होते. सकाळी 9 वा. पासून महिलांच्या नानाविध सांस्कृतिक कार्यक्रमाने रंगलेल्या या महिला दिन विशेष कार्यक्रमाप्रसंगी महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. त्यामुळे हा कार्यक्रम जल्लोषात संपन्न झाला.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai