47 पैकी 36 हरकती बोगस?
- by Aajchi Navi Mumbai
- Mar 13, 2026
- 22
पामबीच भुयारी मार्गाला सहकार्य करण्याचे पालिकेचे आवाहन
नवी मुंबई ः सानपाडा आणि जुईनगर परिसरातील नागरिकांना शहराबाहेर पडताना होणाऱ्या वाहतूक कोंडीतून दिलासा मिळण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेने पामबीच मार्गालगत सेक्टर 19, सानपाडा येथे पर्यायी मार्ग स्वरुपात अंडरपास बांधण्याचे नियोजन केलेले आहे. या प्रकल्पाच्या विकासकामात येथील 440 वृक्षांवर कुऱ्हाड बसणार असल्याने या मार्गाला विरोध होत आहे. मात्र पालिकेने वृक्षांबाबत करावयाच्या कार्यवाहीसाठी नागरिकांकडून मागवेल्या हरकतींमध्ये केवळ 11 नागरिक उपस्थित होते. उर्वरितजणांनी आम्ही हरकत घेतली नसल्याचे स्पष्ट केले. यावरुन आलेल्या 36 हरकती बोगस होत्या का असा प्रश्न उपस्थित राहिला आहे.
सानपाडा से.19 पामबीच मार्गावर केसर सोलिटेअर इमारती जवळ अंडरपास तयार करण्याबाबत स्थानिक नागरिकांकडून सातत्याने मागणी करण्यात येत आहे. संपूर्ण सानपाडा नोडमध्ये पामबीच मार्गावरुन प्रवेश करण्याकरिता मोराज सर्कल जवळ एकमेव मार्ग आहे. सद्यस्थितीत नागरिकांची व वाहनांची वाढती संख्या, नजीकचे आंतरराष्ट्रीय विमानतळ, जेएनपीटीचे विस्तारीकरण तसेच नियोजित तिसरी मुंबई अशा विविध प्रकल्पांमुळे पामबीच मार्गावरील वाहतुकीवर मोठया प्रमाणात ताण येणार आहे. परिणामी वाहतूक कोंडी होण्याची दाट शक्यता आहे. त्या अनुषंगाने वाहतूक नियमनाच्या सर्व बाबी तपासून तांत्रिक सल्लागारांमार्फत बेलापूर, उरण कडील तसेच वाशी मार्ग व मुंबई दिशेने जाणाऱ्या वाहनांची रहदारी सुलभ होण्याच्या दृष्टीने सदर भुयारी मार्ग सुचित करण्यात आला आहे.
या प्रकल्पाच्या क्षेत्रात एकूण 808 वृक्षांची नोंद करण्यात आली होती. त्या वृक्षांपैकी 368 वृक्ष आहे त्याच ठिकाणी जतन केले जाणार आहेत. तसेच प्रकल्पासाठी अनिवार्य असलेल्या 440 वृक्षांपैकी 329 वृक्षांचे शास्त्रीय पद्धतीने त्याच परिसरात पुनरोपण: केले जाणार आहे. सदर वृक्षांबाबत करावयाच्या कार्यवाहीसाठी वृक्ष प्राधिकरणामार्फत या प्रक्रियेसाठी जाहिरात प्रसिद्ध करून नागरिकांच्या हरकती मागवण्यात आल्या होत्या. त्यामध्ये 47 हरकती प्राप्त झाल्या होत्या. त्यांची सुनावणी वृक्ष अधिकारी (तुर्भे) यांच्याकडे आयोजित करण्यात आली होती. या सुनावणीप्रसंगी 11 नागरिक उपस्थित होते. सदर नागरिकांचे म्हणणे संपूर्ण ऐकून घेण्यात आले. या शिवाय अनुपस्थित राहिलेल्या नागरिकांशी वृक्ष अधिकारी, तुर्भे यांनी संपर्क साधला असता, अनेक नागरिकांनी आपण कोणतीही हरकत घेतली नसल्याचे व या विषयी कोणताही पत्रव्यवहार केला नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे काही हरकतींबाबत संभ्रम असल्याचेही निदर्शनास आले आहे.
सानपाडा अंडरपास हा प्रकल्प नागरिकांचा वेळ वाचवण्यासाठी आणि इंधन बचतीसाठी महत्वाचा आहे. यामध्ये नागरिकांच्या सुविधेसोबतच पर्यावरण संरक्षण व संवर्धनाचा समतोल साधण्याचा महानगरपालिका प्रयत्न करीत आहे. याकरिता प्रकल्पासाठी बाधीत होणाऱ्या जास्तीत जास्त झाडांचे पुनरोपण करण्यात येत आहे. तरी नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता शहराच्या विकास प्रकल्पासाठी सहकार्य करावे असे आवाहन नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येत आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai