युध्द पेटले, सिलिंडर घटले
- by Aajchi Navi Mumbai
- Mar 14, 2026
- 28
समाजजीवन गॅसवर; आखाती युद्धाचा जगाला फटका ; व्यवसाय संकटात; हॉटेल्स, खानावळी बंद
नवी मुंबई : आखातात सुरु असलेल्या युद्धाचा फटका अवघ्या जगाला बसत आहे. त्याची झळ आता महाराष्ट्राला बसू लागली आहे. युद्धामुळे देशभरात एलपीजी गॅसचा तुडवडा जाणवत आहे. व्यावसायिक गॅस वितरण बंद करण्यात आले असून घरगुती गॅस मिळवण्यासाठीही संघर्ष करावा लागत आहे. एलपीजी गॅसच्या टंचाईमुळे अनेक हॉटेल्स, खानावळी बंद कराव्या लागल्या आहेत. याचा सर्वांत जास्त फटका शहरात राहणाऱ्या पेईंग गेस्ट व मेसच्या जेवणावर अवलंबून असलेल्या विद्यार्थी आणि नोकरदार वर्गाला बसला आहे. एकुणच युद्धामुळे समाजजीवन गॅसवर असल्याचे विदारक चित्र पाहायला मिळत आहे.
राज्यातील औद्योगिक पट्ट्यांमध्ये नोकरीसाठी बाहेरील राज्यातील युवक-युवतींची संख्या मोठी आहे. त्याचसोबत मुंबई, नवी मुंबई, पुणे येथील शैक्षणिक सुविधांमुळे शहराबाहेरील अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी तेथे वास्तव्यासाठी आहेत. या सर्व घटकांची सोय म्हणून त्या-त्या भागात पीजी सुविधा उपलब्ध आहेत. या सुविधेत जेवणाची सोय नसल्याने या ठिकाणी राहणारे बहुतेक विद्यार्थी आणि नोकरदार खानावळींवरच अवलंबून असतात. मात्र गेल्या काही दिवसांपासून एलपीजी सिलिंडरच्या पुरवठ्यात अडथळे निर्माण झाल्याने अनेक खानावळींना स्वयंपाक करणे कठीण झाले आहे. नियमितपणे मिळणारे व्यावसायिक गॅस सिलिंडर वेळेवर मिळत नसल्याने स्वयंपाकाचे नियोजन कोलमडले आहे. काही ठिकाणी उपलब्ध सिलिंडर संपल्यानंतर नवीन सिलिंडर मिळण्यास विलंब होत असल्याने खानावळी तात्पुरत्या बंद ठेवाव्या लागत आहेत. पीजीमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांनी सांगितले की, नियमित खानावळ बंद असल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या ठिकाणी जेवणाची व्यवस्था करावी लागत आहे. दरम्यान, खानावळ चालकांनी प्रशासनाने एलपीजी सिलिंडरचा पुरवठा सुरळीत करण्यासाठी तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी केली आहे. अन्यथा येत्या काही दिवसांत आणखी खानावळी बंद पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
- कामगारांचे हाल
स्वयंपाकासाठी घरगुती गॅस सिलेंडर मिळत नसल्याने तळोजा औद्योगिक वसाहतीतील कंत्राटी कामगारांची मोठी अडचण निर्माण झाली आहे. पूर्वी सुमारे 400 रुपयांना मिळणारा पाच किलोचा सिलेंडर काळ्या बाजारात 900 रुपयांपर्यंत पोहोचला आहे. मात्र बुधवारी सायंकाळपासून दुप्पट किंमत मोजूनही सिलेंडर मिळत नसल्याने हजारो कामगारांवर उपासमारीची वेळ ओढवली आहे. पुढील काही दिवसांत ही परिस्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे.
- जिल्हास्तरीय समित्या स्थापन
घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरच्या पुरवठ्यात अडथळे निर्माण होऊ नयेत आणि संभाव्य टंचाईच्या परिस्थितीत समन्वय साधता यावा, यासाठी राज्य शासनाने जिल्हास्तरावर विशेष समित्या स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, जिल्हा पुरवठा अधिकारी आणि सर्व सरकारी गॅस कंपन्यांचे अधिकारी यांचा या समित्यांमध्ये समावेश असेल. गॅस पुरवठा साखळीवर देखरेख ठेवणे, कायदा व सुव्यवस्था राखणे तसेच दररोज परिस्थितीचा आढावा घेऊन अहवाल सादर करणे ही समित्यांची प्रमुख जबाबदारी असेल. - अत्यावश्यक सेवांना प्राधान्य
रुग्णालये, शासकीय वसतिगृहे, शासकीय शाळा/महाविद्यालयांमधील मेस, मध्यान्ह भोजन योजना, शासकीय आश्रमशाळा आदी अत्यावश्यक सेवा देणाऱ्या संस्थांना घरगुती/व्यावसायिक गॅसचा पुरवठा प्राधान्याने देण्यात येणार असून अशा संस्थांची यादी प्रसिध्द करण्यात येणार आहे. अत्यावश्यक सेवांना एलपीजी पुरवठा प्राधान्याने देण्यासाठी स्वतंत्र प्राधान्यक्रमही निश्चित केला जाणार आहे. - गॅस सिलेंडरचा साठा करू नये
आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीमुळे निर्माण झालेला औद्योगिक व व्यावसायिक गॅसचा तुटवडा तात्पुरता असून घरगुती गॅस सिलेंडर पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहेत. यामुळे नागरिकांनी अस्वस्थ होऊन घाबरून न जाता गॅस सिलेंडरचा साठा करून ठेवू नये असे सूचित करण्यात येत आहे. घरगुती वापरासाठीचा गॅस पुरवठा सुरळीत राखण्याला सर्वोच्च प्राधान्य दिले जात असून तरी नागरिकांनी गॅस सिलेंडरचा साठा करून ठेवू नये व कोणत्याही अफवांना बळी पडू नये आणि अधिकृत विश्वासार्ह माहितीवरच विश्वास ठेवावा असे आवाहन नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येत आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai