नाईकांचा शिंदेंना चेकमेट?
- by Aajchi Navi Mumbai
- Mar 20, 2026
- 28
संवर्गात नसलेल्या प्रतिनियुक्त अधिकाऱ्यांच्या पाठवणीचा प्रस्ताव
नवी मुंबई ः मागील सहा वर्ष प्रशासकामार्फत एकनाथ शिंदे यांनी महापालिकेच्या कारभारात ढवळाढवळ करत मनमानी निर्णय घेऊन पालिकेची तिजोरी रिकामी केल्याचा आरोप नाईकांनी अनेकवेळा केला होता. त्यामुळे सत्ता हातात येताच त्यांनी शिंदे यांची महापालिकेतील प्यादी हलवण्यासाठी सर्वसाधारण सभेत शासनाने नेमलेल्या प्रतिनियुक्तीवरील अधिकाऱ्यांची पाठवणी करण्याचा प्रस्ताव ठेवल्याने शिंदे यांना हा चेकमेट असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
गेली 25 वर्षे गणेश नाईक यांनी नवी मुंबई महानगरापलिकेची एकहाती कमान सांभाळली असून त्यांनी कोणत्याही राजकीय नेत्याला नवी मुंबईत वरचढ होऊ दिले नाही. त्याचबरोबर नवी मुंबई बाहेरील कोणत्याही पक्षाच्या नेत्याला महापालिकेच्या कारभारात ढवळाढवळ करु दिली नाही. परंतु, कोरोनानंतर राज्यातील सर्वच महापालिकांच्या निवडणुका या ना त्या कारणाने पुढे ढकलल्याने पालिकेचा कारभार हा सरकार नियुक्त प्रशासकामार्फत हाकण्यात येत होता. त्यामुळे पालिकेतील स्थानिक नेत्यांचे वर्चस्व कमी होऊन थेट पालिकेचा कारभार राज्य सरकारच्या हातात गेल्याने त्या खात्याच्या मंत्र्यांची प्रशासनावर पकड होती.
नवी मुंबई महापालिकेत प्रशासकीय काळात नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी अनेक अनावश्यक कामे काढल्याचा आरोप अनेकवेळा गणेश नाईक यांनी त्यांचे नाव न घेता जाहीररित्या केला होता. महापालिकेत सध्या अनेकपदांवर सरकारने नेमलेले प्रतिनियुक्तीवर अधिकारी काम पाहत असून त्यांच्यामार्फत शिंदे पालिकेची सुत्र हाकल असल्याचा समज नाईक यांनी करुन घेतला होता. प्रतिनियुक्तीवरील नियुक्ती करताना संबंधित अधिकारी हा त्या संवर्गातील असावा हे अभिप्रेत असतानाही अनेक प्रतिनियुक्तीवरील अधिकारी हे अन्य संवर्गातील असल्याचे बोलले जात आहे. तसेच प्रतिनियुक्तीवरील अधिकाऱ्यांची वागणुक ही स्थानिक लोकप्रतिनिधींचा आदर करणारी नसल्याने यांच्या मुसक्या आवळाव्यात असा तकादा अनेक नगरसेवकांनी नाईकांकडे लावला होता.
शिंदे यांची महापालिकेतील पकड ढिली व्हावी व राज्य सरकारला योग्य संदेश जावा म्हणून सर्वसाधारण सभेत संवर्गातील नसलेल्या प्रतिनियुक्तीवरील अधिकाऱ्यांची तातडीने रवानगी त्यांच्या मुळ विभागात करावी असा प्रस्ताव सादर केला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अधिकाऱ्यांना प्रतिनियुक्तीवर पाठविण्याचा राज्य सरकारचा अधिकार असला तरी नगरविकास विभागाच्या अखत्यारित येत असलेल्या वेगवेगळ्या संवर्गातील हे अधिकारी असावेत असे गृहीत धरले जाते. नगरपालिका प्रशासनात काम करणाऱ्या संवर्गातील तसेच मंत्रालयीन संवर्गातील अधिकाऱ्यांची यासाठी अग्रक्रमाने नियुक्ती केली जाते. असे असताना गेल्या काही वर्षात महापालिका सेवेत महसूल, आरोग्य, पशुवैद्यकीय अशा वेगवेगळ्या सेवेतील अधिकारीही नियुक्त होत असतात. नेमक्या या ‘संवर्गाच्या’ मुद्द्यावर बोट ठेवत अशा अधिकाऱ्यांना परत पाठविले जावे, असा ठराव सूरज पाटील यांनी मांडला आहे. महापालिका अधिनियमातील तरतूदींचा आधार हा ठराव मांडताना घेण्यात आला असला तरी गेल्या काही वर्षांत राज्य सरकारने नियुक्त केलेल्या अधिकाऱ्यांना लक्ष्य करत थेट शिंदे यांनाच चेकमेट करण्याचा हा प्रयत्न असल्याची चर्चा आहे.
सदर प्रस्ताव कायद्याचा काटेकोर अभ्यास करुन सादर केला असल्याने व तो निश्चितच मंजुर होणार असल्याने प्रतिनियुक्तीवरील अधिकाऱ्यांची पाठवणी झाल्यास त्यांची नियुक्तीसाठी केलेली गुंतवणुक धोक्यात येण्याची शक्यता असल्याने त्यांचे धाबे दणाणले आहेत. अनेकांनी नाईकांची आपल्या हस्तकांमार्फत मनधरणी करण्याचा प्रयत्न सुरु केला असला तरी नाईकांचे लक्ष वेगळे असल्याने ते कोणालाही भीक घालत नसल्याने सर्वसाधारण सभेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai