876 कोटींचा कर वसूल करण्याचा विक्रम
- by Aajchi Navi Mumbai
- Apr 03, 2026
- 33
मालमत्ता कर वसुलीत पालिकेची ऐतिहासिक कामगिरी
नवी मुंबई ः महापालिकेच्या मालमत्ता कर विभागाने आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये म्हणजेच 1 एप्रिल 2025 ते 31 मार्च 2026 या कालावधीत तब्बल 876 कोटींचा मालमत्ता कराची विक्रमी वसुली करीत ऐतिहासिक कामगिरी केली आहे. नवी मुंबई महापालिकेची स्थापना झाल्यापासून एका आर्थिक वर्षात वसूल केलेला हा सर्वात जास्त मालमत्ता कर आहे. शहरातील करदात्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसाद, 10 मार्च 2026 ते 31 मार्च 2026 या काळातील अभय योजना आणि महापालिकेच्या नियोजनबद्ध वसुली मोहिमेमुळे ही कामगिरी शक्य झाली असल्याचे बोलले जाते.
महापालिकेच्या मालमत्ता कर विभागाने यावर्षी अतिरिक्त आयुक्त सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली व उपायुक्त डॉ. अमोल पालवे यांच्या अधिपत्याखाली कर वसुलीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर केला आहे. ऑनलाईन पेमेंट प्रणाली तसेच विविध डिजिटल माध्यमांद्वारे नागरिकांना कर भरण्यासाठी सुलभ सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. यासोबतच, कर भरण्याबाबत एसएमएस, नोटीस, व्हॉट्सअप मेसेज व प्रत्यक्ष भेटीद्वारे नियमित पाठपुरावा करण्यात आल्याने वसुलीच्या प्रक्रियेला गती मिळाली. तसेच नोकरदार वर्गास आणि सर्वसामान्य नागरिकांना मार्च 2026 मध्ये साप्ताहिक व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी देखील कर भरणे सुलभ व्हावे, यासाठी महापालिकेची कर संकलन केंद्रे सुरू ठेवण्यात आली होती. नवी मुंबई महानगरपालिकेकडून 10 मार्च 2026 ते 31 मार्च 2026 या कालावधीत थकबाकीदारांना दिलासा देत कर भरण्यास प्रोत्साहन देण्यासाठी अभय योजना सुरू करण्यात आली होती. या योजनेअंतर्गत निवासी, बिगरनिवासी, औद्योगिक तसेच मोकळ्या जागांच्या मालमत्ता कराची थकबाकी एकरकमी भरल्यास संबंधित मालमत्ताधारकांना विलंब शास्तीवर 50 टक्के सवलत देण्यात आली होती.
मालमत्ता कर विभागाने मालमत्ताधारकांसाठी उपलब्ध करून दिलेल्या या सर्व सुविधांमुळे यंदा नवी मुंबई महानगरपालिकेच्या मालमत्ता करामध्ये विक्रमी वाढ झाली आहे. आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये 876 कोटींची वसुली करण्यात आली आहे. या ऐतिहासिक कामगिरीमागे नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांचे प्रभावी नेतृत्व, दूरदृष्टी आणि प्रशासनातील काटेकोर नियोजन महत्त्वाचे ठरले आहे. कर वसुली प्रक्रियेत पारदर्शकता, तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर आणि नागरिकांपर्यंत पोहोचणारी कार्यपद्धती यावर त्यांनी विशेष भर दिला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांमुळे करदात्यांमध्ये विश्वास निर्माण झाला असून, त्याचा सकारात्मक परिणाम गेल्या दोन वर्षांपासून मालमत्ता कर वसुलीमध्ये दिसत आहे. यंदा मालमत्ता कराची विक्रमी वसुली साध्य झाली आहे.
- नेरूळ प्रभागातून सर्वात जास्त वसुली
नेरूळ प्रभागातून सर्वात जास्त वसुली झाली आहे. या कालावधीत या कार्यालयाने 182 कोटी 09 लाख रुपयांची वसुली केली आहे. तर, कोपरखैराणे प्रभागातून 163 कोटी 40 लाख रुपये, घणसोली प्रभागातून 150 कोटी 11 लाख रुपये अशी वसुली झाली आहे.
- ऑनलाईन कर भरण्यास पसंती
2 लाख 25 हजार 576 मालमत्ताधारकांपैकी जवळपास 61 टक्के मालमत्ताधारकांनी ऑनलाईन तर 39 टक्के मालमत्ताधारकांनी ऑफलाईन कर भरला आहे.
मालमत्ता कर वसुलीची ठळक वैशिष्ट्ये
- नेरूळ प्रभागातून सर्वाधिक 182 कोटी 09 लाख रुपयांची वसुली
- कोपरखैरणे, घणसोली व तुर्भे प्रभागांचाही वसुलीत लक्षणीय वाटा
- कर भरण्याचे प्रमाण लक्षणीय वाढले आहे.
- मार्च 2026 मध्ये 28 हजार 811 मालमत्ताधारकांनी तब्बल 192 कोटी 81 लाख 37 लाख 335 रुपयांची वसुली
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai