अतिक्रमण विभागातील सावजं लाचलुचपत विभागाच्या गळाला?
- by Aajchi Navi Mumbai
- Apr 25, 2026
- 57
डॉ.कैलास गायकवाड प्रकरणात अनेक अधिकाऱ्यांना चौकशीचे समन्स
नवी मुंबई ः अतिक्रमण विभागाचे उपायुक्त कैलास गायकवाड यांना 21 एप्रिल रोजी 42 हजार रुपयांची लाच घेताना पालिका मुख्यालयातून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. आरोपी गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनंतर तपास अधिकारी यांनी अतिक्रमण विभागातील त्यांच्या 15 सहकाऱ्यांना चौकशीसाठी बोलावले होते. याप्रकरणाने आता गंभीर वळण घेतले असून चौकशीअंती अनेक सावजं लाचलुचपत विभागाच्या गळाला लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पालिकेचा अतिक्रमण विभाग आणि भ्रष्टाचार यांचे अतूट नाते असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. 2009 साली तत्कालीन पालिका आयुक्त विजय नाहटा यांनी अतिक्रमण विभागात चुकीची देयके अदा केल्या प्रकरणी केलेल्या तक्रारीवरुन या विभागातील अनेक अधिकाऱ्यांना तुरुंगात जावे लागले होते. नुकतेच याच विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड यांना ठेकेदाराचे बील अदा करण्यासाठी 42 हजारांची लाच पालिका मुख्यालयात घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. 22 एप्रिल रोजी त्यांना न्यायालयात हजर केले असता त्यांना 24 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 23 एप्रिल रोजी पालिका आयुक्त यांना पत्र देऊन अतिक्रमण विभागातील 15 अधिकाऱ्यांना गुन्ह्याच्या तपासकामी 24 एप्रिल रोजी हजर राहण्यास समज देण्याचे पत्र दिले. यापैकी काही अधिकाऱ्यांनी आपली हजेरी लावली असून त्यांचा जबाब नोंदवल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांना त्यांचे बँक पासबूक सादर करण्यास सांगितल्याचे खात्रीलायक सूत्रांकडून कळत आहे. तपास अधिकाऱ्यांच्या या मागणीमुळे अनेक अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले असून अजून कोणते दस्तऐवज मागितले जातील याची धास्ती त्यांनी घेतली आहे. या विभागातील अनेक अधिकाऱ्यांनी नवी मुंबईत स्थावर जंगम मालमत्ता घेतली असल्याने त्याचा स्त्रोतही द्यावा लागणार असल्याने सध्या पालिकेत चिंतेचे वातावरण आहे.
भ्रष्टाचाराची साखळी खालपासून वरपर्यंत असून कनिष्ठ अधिकाऱ्यामार्फत जमा होणारी माया ही वरिष्ठांपर्यंत पोहचत असल्याने या चौकशीत वरिष्ठ अधिकाऱ्यांची नावे समोर येणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पालिकेत अतिक्रमण सारख्या मालदार खात्यात पोस्टींगसाठीही वरिष्ठांचे हात ओले करावे लागत असल्याने एका डॉक्टराला रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यास सांगण्याऐवजी शहरातील अतिक्रमणांवर हातोडा चालवण्याची जबाबदारी देण्यामागे संबंधित वरिष्ठांचा हेतूही तपासणे गरजेचे आहे. लाचलुतपत प्रतिबंधक विभागाने सुरु केलेल्या या चौकशीत अतिक्रमण विभागातील किती सावजं अडकतात ते पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
- कैलास गायकवाड निलंबित
महापालिकेतील लाचप्रकरणी अटक करण्यात आलेल्या उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड यांना न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. 24 तास एखादा अधिकारी पोलीस कोठडीत राहिल्यास त्याला निलंबित करावे लागते. - या नियमानुसार पालिका आयुक्तांनी अखेर कैलास गायकवाड यांचे निलंबिन केले आहे. निलंबन कालावधीत त्यांना सार्वजनिक रुग्णालय, वाशी येथे राहायचे असून आयुक्तांच्या पूर्वपरवानगीशिवाय त्यांना मुख्यालय सोडता येणार नाही. तसेच निलंबन काळात खासगी नोकरी किंवा व्यवसाय करता येणार नसल्याचे आदेशात नमूद केले आहे.
- आ.मंदा म्हात्रे यांची चौकशीची मागणी
डॉ. कैलास गायकवाड यांच्यावर झालेल्या कारवाईनंतर त्यांच्यामागे कोणाचे संरक्षण आहे, याची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी आमदार मंदा म्हात्रे यांनी केली आहे. यापुर्वी त्यांना भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून सेवेतून बडतर्फ केलेले असताना अशा अधिकाऱ्यांना पुन्हा प्रशासनात संधी दिली जाणे ही गंभीर बाब आहे. त्यामुळे त्यांना सेवेत घेणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी होणे गरजेचे आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai