‘टीबी मुक्त मुंबई’ अभियानाला सुरुवात
- by Aajchi Navi Mumbai
- May 27, 2026
- 30
मुंबईला टीबीमुक्त करण्यासाठी लोकसहभाग आवश्यक
मुंबई : टीबी मुक्त भारत अभियान मुंबईच्या कानाकोपऱ्यात पोहचवण्याच्या दृष्टीने बृहन्मुंबई महापालिकेच्या वतीने आयोजित या अभियानाचा शुभारंभ राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत सायन येथील लोकमान्य टिळक महारपालिका सर्वसाधारण रुग्णालय येथे करण्यात आला. राज्यपालाच्या हस्ते राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमात सहभागी स्वयंसेवी संस्थांचा देखील यावेळी सत्कार करण्यात आला.
लोकभवनच्या पुढाकाराने आयोजित टीबी मुक्त मुंबई मोहिमेच्या उद्घाटनावेळी टीबी मुक्त मुंबई च्या अभियानावर आधारित माहिती पुस्तकाचे राज्यपालांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. बृहन्मुंबई आणि आसपासच्या परिसराची लोकसंख्या जवळपास दोन कोटींच्या घरात पोहोचली आहे. दाट लोकवस्तीमुळे टीबीसारख्या संसर्गजन्य रोगांचा प्रसार होण्याचा धोका अधिक आहे. त्यामुळे लोकभवनच्या पुढाकाराने ‘टीबी मुक्त मुंबई’ अभियान सुरु करण्यात आले असून अभियानात लोकसहभाग आवश्यक असल्याचे राज्यपालांनी सांगितले. मुंबईला टीबीमुक्त करण्यात आपण यशस्वी झालो, तर ते केवळ भारतासाठीच नव्हे तर संपूर्ण जगासाठी उदाहरण ठरेल. त्यामुळे मुंबईची प्रतिमा अधिक चांगली होईल. या अभियानाच्या वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये विद्यापीठे आणि महाविद्यालयांतील विद्यार्थी, रेड क्रॉस सोसायटी, एनसीसी, ‘माय युवा भारत’चे स्वयंसेवक, स्काऊट व गाईड, स्वयंसेवी संस्था तसेच विविध सामाजिक संघटनांना सहभागी केले जाणार आहे असे राज्यपालांनी यावेळी सांगितले.
टीबीवर योग्य वेळी उपचार केल्यास तो पूर्णपणे बरा होऊ शकतो. यासाठी शासनाकडून तपासणी व उपचाराच्या सुविधा मोफत उपलब्ध करून दिल्या जातात, याची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याची आवश्यकता आहे. विकसित भारताचे उद्दिष्ट गाठण्यासाठी देश टीबी मुक्त होणे आवश्यक असून त्या दृष्टीने ‘टीबी मुक्त मुंबई’ अभियान महत्वाचे आहे. सरकार आणि समाजाने एकत्रित येऊन कार्य केल्यास हमखास यश लाभते असे राज्यपालांनी यावेळी सांगितले. सुरुवातीला राज्यपालांनी धारावी येथील एकनाथराव गायकवाड आरोग्य केंद्र येथे क्षयरोग अधिकारी, कर्मचारी, आशा सेविका यांचेशी संवाद साधला; तसेच क्षयरुग्णांना पोषण आहार किटचे वितरण केले. या कार्यक्रमात राज्यपालांनी 30 क्षयरुग्णांच्या पोषण आहाराची जबाबदारी स्वीकारली. राज्यपालांच्या या निर्णयाबद्दल महापौर रितू तावडे यांनी राज्यपालांना निक्षय मित्र प्रमाण पत्र प्रदान केले. राज्यपालांच्या हस्ते भारत पेट्रोलियम, न्यारा एनर्जी, अदाणी फाउंडेशन, मेट्रोपोलीस हेल्थ आदी संस्थांना त्यांच्या क्षयरोग अभियानातील सहभागाबद्दल प्रशस्ती प्रमाणपत्र देण्यात आले.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai