‘फ्लेमिंगो ब्ल्यू कार्बन अर्बन कॉम्प्लेक्स’ ला केंद्राचा सकारात्मक प्रतिसाद
- by Aajchi Navi Mumbai
- May 27, 2026
- 28
नवी मुंबई : जागतिक स्तरावर आदर्श ठरेल अशा ‘फ्लेमिंगो ब्ल्यू कार्बन अर्बन कॉम्प्लेक्स’ उभारणीच्या प्रस्तावाला केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने सकारात्मक प्रतिसाद दिला असून, महाराष्ट्र राज्य वेटलँड प्राधिकरणाला या उपक्रमाची प्राधान्याने तपासणी करण्याचे निर्देश दिले आहेत.
जागतिक पर्यावरण दिनाआधी पंतप्रधानांना प्रस्ताव सादर‘नॅटकनेक्ट फाउंडेशन’ने जागतिक पर्यावरण दिनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे हा प्रस्ताव सादर केला. यासोबत 10 पानी धोरणात्मक श्वेतपत्रिकाही देण्यात आली असून, मुंबई महानगर प्रदेशाला जागतिक हवामान-प्रतिरोधक मॉडेल म्हणून विकसित करण्याची संकल्पना मांडण्यात आली आहे. यात वेटलँड्स, मँग्रोव्ह, चिखलपट्ट्या, फ्लेमिंगो अधिवास, इको-टुरिझम आणि ब्ल्यू-कार्बन फायनान्स यांचा समावेश आहे. वेटलँड कंप्लायन्स विभागातील शास्त्रज्ञ पंकज वर्मा यांनी स्वाक्षरी केलेल्या पत्रात मंत्रालयाने या प्रस्तावाचे कौतुक करत राज्य प्राधिकरणाला तातडीने कार्यवाही करण्यास सांगितले आहे. तसेच, या संदर्भातील कृती अहवालाची प्रत नॅटकनेक्टलाही देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
या श्वेतपत्रिकेनुसार, ठाणे खाडी, शिवडी मडफ्लॅट्स, उरण वेटलँड्स आणि नवी मुंबईतील किनारी भागांमध्ये फ्लेमिंगोंची हालचाल ही संपूर्ण भरती-ओहोटी परिसंस्थेच्या आरोग्याचे प्रतीक मानली जाते. मँग्रोव्ह आणि किनारी वेटलँड्स हे जगातील सर्वाधिक कार्बन साठवणारे परिसंस्था प्रकार मानले जातात. हे नैसर्गिक हवामान संरक्षक म्हणून पूर नियंत्रण, तापमान कमी करणे आणि जैवविविधतेचे संरक्षण यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतात. तसेच ब्ल्यू-कार्बन क्रेडिट्स, जैवविविधता निधी, इको-टुरिझम आणि पूर टाळल्यामुळे होणारी आर्थिक बचत यांमधून दीर्घकालीन आर्थिक लाभ मिळू शकतात, असेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
नॅटकनेक्टचे संचालक बी. एन. कुमार यांनी पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील वेटलँड्सकडे केवळ आर्थिक फायद्यासाठी वापरता येणाऱ्या जमिनी म्हणून पाहिले जात असल्याबद्दल चिंता व्यक्त केली. त्यांनी सांगितले की, या क्षेत्रांचे पर्यावरणीय आणि आर्थिक महत्त्व दुर्लक्षित केले जात आहे. श्वेतपत्रिकेत सिडकोकडून डीपीएस फ्लेमिंगो लेकच्या 12 हेक्टर जागेच्या व्यापारीकरणाच्या प्रस्तावावरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. ही जागा ‘कन्झर्वेशन रिझर्व्ह’ म्हणून घोषित करण्याचा विचार सुरू असतानाच अशा प्रकारच्या रिअल इस्टेट मूल्यांकनामुळे वेटलँड्सच्या दीर्घकालीन हवामान संरक्षणात्मक भूमिकेकडे दुर्लक्ष होत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. पर्यावरण अभ्यासक नंदकुमार पवार यांनी वेटलँड्स नष्ट झाल्यामुळे मुंबई परिसरातील पूरधोक्यात वाढ होत असल्याचा इशारा दिला. एमएमआरमधील विविध पर्यावरण संघटनांनी या प्रस्तावाला पाठिंबा दर्शविला असून, पाणथळ प्रदेशांवरील अतिक्रमण आणि विस्कळीत नागरीकरण कायम राहिल्यास मुंबईला भविष्यात पूर, उष्णतेच्या लाटा आणि किनारी अस्थिरतेचा अधिक गंभीर फटका बसू शकतो, अशी भीती पर्यावरणवाद्यांनी व्यक्त केली आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai