राज्यातील विविध भागात एफडीएची कारवाई
- by Aajchi Navi Mumbai
- May 29, 2026
- 17
28 लाखांहून अधिक संशयास्पद साठा जप्त; तुकाराम मुंढेंच्या ॲक्शन मोडने भेसळखोरांचे धाबे दणाणले
नवी मुंबई : आपल्या बेधडक आणि निडर कार्यशैलीसाठी तसेच कठोर अंमलबजावणीसाठी प्रसिद्ध असणारे ज्येष्ठ सनदी अधिकारी तुकाराम मुंढे अन्न आणि औषध प्रशासनाच्या आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर धडाकेबाज कामाला सुरुवात केली आहे. त्यांनी कार्यभार स्वीकारल्यापासून केवळ तीन दिवसांत 3 दिवसांत 53 धाडी आणि 33 जणांना अटक केल्याने भेसळखोरांचे धाबे दणाणले आहेत. त्यांच्या कारवाईच्या धडाक्याने सर्वसामान्यांमधून त्यांचे कौतुक होत आहे.
सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांचा प्रशासनात मोठा दरारा आहे. गेल्या आठवड्यात त्यांच्या सेवेतील 25 वी बदली अन्न आणि औषध प्रशासन विभागात झाली. 26 मे रोजी कार्यभार स्वीकारल्यानंतर तुकाराम मुंढे यांनी धडकपणे भेसळखोरांविरोधात कारवाईला सुरुवात केली. केवळ 60 तासांत त्यांनी राज्यातील विविध ठिकाणी मोठ्या कारवाया केल्या. अन्न सुरक्षा व मानके कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या अनेक अन्न व्यावसायिकांवर कडक कारवाई करण्यात आली आहे. तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी राज्यातील विविध संशयास्पद भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर छापे टाकले. यामध्ये प्रामुख्याने गुटखा, पानमसाला व तत्सम प्रतिबंधित अन्नपदार्थांच्या प्रकरणी एकूण 53 आस्थापनांची कसून तपासणी करण्यात आली. त्यापैकी 34 ठिकाणी बंदी असलेला गुटखा आणि पानमसाल्याची सर्रास विक्री होत असल्याचे रंगेहात आढळून आले. या प्रकरणी पोलिसांनी एकूण 25 एफआयआर दाखल केले असून गुन्ह्यात सामील असलेल्या 33 व्यक्तींना अटक केली आहे. तसेच गुटखा वाहतूक करणारी 5 वाहने जप्त करून 27 आस्थापनांना थेट सील ठोकण्यात आले आहे.
सर्वात मोठी कारवाई बृहन्मुंबई विभागात पाहायला मिळाली. मुंबई विभागात एकूण 19 आस्थापनांची झाडाझडती घेण्यात आली असून या आस्थापनांना तातडीने सील करण्यात आले आहे. तसेच कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या 19 व्यक्तींविरुद्ध एफआयआर दाखल करून त्यांना पोलिसांनी अटक केली आहे. प्रतिबंधित गुटखा, सुगंधित तंबाखू आणि दिशाभूल करणारे पॅकिंग यावर प्रशासनाने हा मोठा प्रहार केला आहे. गुटखा आणि पानमसाल्याव्यतिरिक्त, अन्न व औषध प्रशासनाच्या विविध विभागांतील अधिकाऱ्यांनी आणखी 23 मोठ्या आस्थापनांची तपासणी केली. यामध्ये नागरिकांच्या दैनंदिन खाण्यापिण्याशी संबंधित असलेल्या पॅकबंद पिण्याचे पाणी, दूध, नुडल्स, कार्बोनेटेड वॉटर, खाद्यतेल, स्वीट व फरसाण, आईसक्रीम, ताडी, डिंक, मसाले, खवा, पनीर, तूप, बेसन व बेकरी पदार्थांच्या शुद्धतेची तपासणी करण्यात आली. या कारवाईत सुमारे 28 लाख 78 हजार 572 रुपये किमतीचा संशयास्पद आणि नियमबाह्य अन्नपदार्थाचा साठा जप्त करण्यात आला आहे. हे सर्व अन्नपदार्थ असुरक्षित उत्पादन प्रक्रियेद्वारे तयार केले जात होते. जप्त केलेल्या सर्व अन्नाचे नमुने पुढील विश्लेषणासाठी आणि प्रयोगशाळेच्या चाचणीसाठी पाठवण्यात आले आहेत.एफडीएच्या अधिकाऱ्यांनी ठाण्यातही विविध अन्न आस्थापनांची तपासणी करून तब्बल 7 लाख 30 हजार रुपयांपेक्षा जास्त किंमतीचा संशयास्पद साठा जप्त केला आहे. याच दिवशी सहा आरोपींवर गुन्हे दाखल करून त्यांना अटक केली आहे.
अन्न व औषध प्रशासनाने सर्व अन्न व्यावसायिकांना अन्न सुरक्षेच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आणि स्वच्छता राखण्याचे कडक आवाहन केले आहे. नागरिकांना अन्नपदार्थांच्या दर्जाबाबत काही तक्रार असल्यास त्यांनी प्रशासनाचा टोल फ्री क्रमांक 1800222365 वर संपर्क साधावा किंवा वागळे इस्टेट, ठाणे येथील सह आयुक्त कार्यालयात लेखी तक्रार करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. सार्वजनिक आरोग्याच्या रक्षणासाठी आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली अशी कडक कारवाई यापुढेही नियमितपणे सुरू राहील, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.
...........................................
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai