9 लाख 19 हजार मतदारांची पडताळणी करणार
- by Aajchi Navi Mumbai
- Jul 04, 2026
- 24
एसआयआरसाठी बीएलओ यांना सहकार्य करा ; पालिकेचे नागरिक व राजकीय पक्षांना आावाहन
नवी मुंबई ः मतदान करणे हा संविधानाने प्रत्येक भारतीय नागरिकाला दिलेला हक्क असून मतदार यादीत नाव असण्यासाठी मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमामध्ये प्रत्येक मतदाराने सन 2002 च्या मतदार यादीशी मॅपींग करून घेणे अत्यावश्यक आहे. याकरिता 30 जूनपासून 29 जुलैपर्यंत आपल्या घरी येणाऱ्या मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांनी दिलेले गणनापत्र माहिती भरून त्यांच्याकडेच परत करावयाचे आहे. यामध्ये प्रत्येक नागरिकाने सहभागी व्हावे असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून नागरिक व राजकीय पक्षांना केले.
भारत निवडणूक आयोगाने घोषित केल्याप्रमाणे मतदार याद्यांचा विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत 30 जूनपासून बीएलओ यांच्यामार्फत माहिती संकलनासाठी गृहभेटींना सुरूवात झालेली आहे. याविषयी नवी मुंबई पालिकेच्या वतीने नागरिकांपर्यंत माहिती पोहचविण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी नमुंमपा आयुक्त डॉ.कैलास शिंदे, अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी तथा नमुंमपा अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार, 150 ऐरोली मतदार नोंदणी अधिकारी प्रिती पाटील व 151 बेलापूर मतदार नोंदणी अधिकारी अश्विनी पाटील उपस्थित होते. या कार्यक्रमांतर्गत नवी मुंबई पालिका क्षेत्रातील 2 विधानसभा मतदार संघातील 827 मतदान केंद्राशी जोडलेल्या 9,19,697 मतदारांची नावे मतदार यादीत समाविष्ट करण्यासाठीची पात्रता तपासली जाणार आहे. याकरिता 150 ऐरोली करिता 18 आणि 151 बेलापूर करिता 20 अशा एकूण 38 सहायक मतदार नोंदणी अधिकारी यांची नेमणूक करण्यात आलेली आहे.
यापूर्वी जाहीर केल्याप्रमाणे सेल्फ मॅपींग व प्रोजिनी मॅपींग मध्ये 9,19,697 मतदारांपैकी 4,97,591 मतदारांचे मॅपींग पूर्ण झाले असून 30 जूनपासून 29 जुलैपर्यंत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) आपापल्या मतदान केंद्र क्षेत्रातील घरोघरी जाऊन गणनापत्रांचे दोन प्रतीत वितरण करणार आहेत व त्यात नागरिकांनी आवश्यक माहिती भरून स्वाक्षरी केलेली गणनापत्रे स्विकारणार आहेत. बीएलओ यांच्यामार्फत 29 जुलैपर्यंत गणनापत्रे संकलित केल्यानंतर मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण करण्यात येणार असून 5 ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिध्द केल्या जाणार आहेत. या प्रारूप मतदार यादीत आपल्या नावाचा समावेश नसल्यास किंवा कोणाच्या नावाच्या समावेशाबाबत हरकत असल्यास मतदार नोंदणी अधिकाऱ्यांकडे याबाबत हरकती अथवा दावे 5 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर 2026 पर्यंत दाखल करण्याची मुदत आहे. नोटीस टप्पा / दावे व हरकती निकालात काढण्याचा कालावधी 5 ऑगस्ट ते 3 ऑक्टोबर हा असून दि. 7 ऑक्टोबर 2026 रोजी अंतिम मतदार याद्यांची प्रसिध्दी केली जाणार आहे. या अंतिमरित्या प्रसिध्द झालेल्या मतदार यादीमध्ये दाखल केलेले दावे किंवा हरकती फेटाळण्यात आल्या असतील तर पुढील 15 दिवसांत जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, ठाणे (यांचेकडे) अपिल करू शकता व जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, ठाणे (यांचा) निर्णय मान्य नसल्यास पुढील 15 दिवसांत आपण मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांचेकडे अंतिम अपिल दाखल करू शकता.
‘कोणताही पात्र नागरिक मतदार यादीतून वगळला जाणार नाही आणि कोणत्याही अपात्र व्यक्तीचा मतदार यादीत समावेश होणार नाही’ हे भारत निवडणूक आयोगाचे या कार्यक्रमाबाबतचे घोषवाक्य असून 30 जून ते 29 जुलै 2026 या कालावधीत बीएलओ आपल्या घरी भेट देऊन गणनापत्र भरून घेणार आहेत. तरी सर्व मतदारांनी बीएलओ यांना याकामी सहकार्य करून आपले गणनापत्र बीएलओ यांच्याकडे भरून द्यावे व त्याबाबत पोहोच घ्यावी. आपले नाव मतदार यादीत समावेश होण्यासाठी सर्व मतदारांनी सहकार्य करावे असे आवाहन करण्यात येत आहे.
2002 च्या यादीत नाव नसल्यास काय करावे
ज्यांचे नाव 2024 च्या मतदार यादीत समाविष्ट आहे मात्र त्यावेळी वय कमी असल्याने सन 2002 च्या मतदार यादीत नाव समाविष्ट असणार नाही अशा मतदारांनी आपले आई/वडील/आजी/आजोबा यांचे सन 2002 च्या मतदार यादीत असलेले नाव, भाग क्र., मतदार क्रमांक ही माहिती https://electoralsearch.eci.gov.in/ या वेबसाईटवर अथवा ECI NET या ॲपवर ऑनलाईन शोधून त्या गणनापत्रात नोंदवावयाची आहे. ही माहिती उपलब्ध असेल तर आपले नाव मतदार यादीत समावेश करण्यासाठी वेगळयाने कोणतेही पुरावे देण्याची आवश्यकता नाही. मात्र आपले किंवा आपल्या आई/वडील/आजी आजोबा यांचे नांव सन 2002 चे मतदार यादीत नसेल तर आपल्या जन्म तारखेनुसार गणनापत्रात नमूद केलेली पुराव्याची कागदपत्रे सुनावणीच्या वेळेस जमा करावी लागतील.
- 9,19,697 मतदारांची पात्रता तपासणार
- 4,97,591 मतदारांचे मॅपींग पूर्ण
- 38 सहायक मतदार नोंदणी अधिकारी नियुक्त
- 5 ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिध्द
- 5 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर पर्यंत दावे दाखल करण्याची मुदत
- दावे व हरकती निकालात काढण्याचा कालावधी 5 ऑगस्ट ते 3 ऑक्टोबर
- 7 ऑक्टोबर 2026 रोजी अंतिम मतदार याद्यांची प्रसिध्दी
- पुढील 15 दिवसांत अपिल करु शकता
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai