25 लाख 33 हजार मतदारांची पात्रता तपासणार
- by Aajchi Navi Mumbai
- Jul 04, 2026
- 38
मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना सहकार्य करण्याचे जिल्हाधिकारी यांचे आवाहन
रायगड-अलिबाग : रायगड जिल्ह्यात दि.30 जून ते दि.29 जुलै 2026 या कालावधीत विशेष सखोल पुनरीक्षण 2026 मोहीम राबवली जात आहे. या विशेष सखोल पुनरीक्षण 2026 मोहीमेमध्ये माहिती घेण्याकरिता येणाऱ्या मतदान केंद्राच्या मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यास मतदारांनी संपूर्ण सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी केले आहे.
या कार्यक्रमात रायगड जिल्ह्यातील 7 विधानसभा मतदार संघातील 02 हजार 790 मतदान केंदांशी जोडलेल्या 25 लाख 33 हजार 739 मतदारांची नावे मतदार यादीत समाविष्ट करण्यासाठीची पात्रता तपासली जाणार आहे. मतदारास मतदान केंद्रासाठी नेमलेला मतदान केंद्रस्तरीय अधिकारी दि.30 जून ते 29 जुलै, 2026 या कालावधीत मतदाराच्या घरी भेट देऊन मतदाराचे किंवा त्याच्या आई/वडील/आजी/आजोबांचे सन 2002 मधील मतदार यादीतील नावाचा तपशील लिहीलेला आपले गणना प्रपत्र दाखवेल. हा तपशिल बरोबर आहे किंवा कसे याबाबत मतदाराने मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यास सांगावे. तपशील चुकीचा असेल तर मतदाराने त्याचे सन 2002 साली नांव कुठे होते याची माहिती मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यास देऊन नाव शोधण्यास मदत करावी. मतदाराने मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्या गृहभेटीपूर्वी शक्य झाल्यास संकेतस्थळावरुन सन 2002 चे मतदार यादीतील आपला तपशिल शोधून ठेवावा. दि. 05 ऑगस्ट 2026 रोजी आपल्या मतदान केंद्राची प्रारूप मतदार यादी प्रसिध्द होईल. या यादीत मतदाराच्या नावाचा समावेश नसल्यास किंवा कोणाच्या नावाचा समावेशाबाबत हरकत असल्यास तो मतदार नोंदणी अधिकाऱ्यांकडे दि. 05 ऑगस्ट ते 04 सप्टेंबर 2026 या कालावधीत दावे व हरकती दाखल करू शकतो. मतदार नोंदणी अधिकारी मतदाराने दाखल केलेल्या दावे व हरकतींची दिनांक 05 ऑगस्ट ते दि.03 ऑक्टोंबर 2026 या कालावधीत सुनावणी घेऊन ते निर्णीत करतील. अंतिम मतदार यादी दिनांक 07 ऑक्टोबर 2026 रोजी प्रसिध्द होईल. या अंतिमरित्या प्रसिध्द झालेल्या मतदार यादीमध्ये मतदाराने दाखल केलेले दावे किंवा हरकती फेटाळण्यात आल्या असतील तर तो पुढील 15 दिवसांत जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, रायगड यांना अपिल करू शकतो व जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, रायगड निर्णयाने आपण व्यतिथ झाला असाल तर पुढील 15 दिवसांत आपण मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांच्याकडे अंतिम अपिल दाखल करू शकता.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai