64 इमारती अतिधोकादायक
- by Aajchi Navi Mumbai
- Jul 04, 2026
- 29
पावसाळया सतर्क राहण्याचे महापालिकेचे आवाहन
पनवेल ः सन 2026-27 या आर्थिक वर्षासाठी करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार विविध प्रभागांतील एकूण 64 सी-1 प्रवर्गातील (अतिधोकादायक) इमारती जाहीर करण्यात आल्या आहेत. पावसाळयाच्या पार्श्वभूमीवर पनवेल महानगरपालिका कार्यक्षेत्रातील धोकादायक व अतिधोकादायक इमारतींबाबत नागरिकांनी अत्यंत सतर्क राहून आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन महापालिका प्रशासनाच्यावतीने आयुक्त मंगेश चितळे यांनी केले आहे.
महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम 264 ते 268 तसेच शासन निर्देशांनुसार महापालिकेने संबंधित इमारतींचे सर्वेक्षण करून यादी निश्चित केली आहे. या इमारतींमधील रहिवाशांना वेळोवेळी नोटिसा देऊन सदनिका रिक्त करण्यास सूचित करण्यात आले आहे. उच्च न्यायालय, मुंबई तसेच राज्य शासनाच्या आदेशानुसार संबंधित मालक, भोगवटादार व रहिवाशांना इमारती रिक्त करण्याची संधी देण्यात आली होती. मात्र काही ठिकाणी अद्यापही नागरिक वास्तव्यास असल्याचे निदर्शनास आले आहे. अशा इमारतींमधील वीज व पाणीपुरवठा खंडित करून आवश्यक असल्यास पोलिस बंदोबस्तात इमारती रिकाम्या करण्याची कारवाई करण्यात येणार असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे. सध्या पावसाळा सुरू असून अतिवृष्टीमुळे धोकादायक इमारती कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नागरिकांनी स्वतःच्या व कुटुंबाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अशा इमारती तात्काळ रिकाम्या करून सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
धोकादायक इमारतीत राहून कोणतीही दुर्घटना घडल्यास जीवित वा वित्तहानीबाबत संबंधित रहिवासी, मालक व भाडेकरू स्वतः जबाबदार राहतील. तसेच इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करून घेण्याची जबाबदारीही संबंधित मालक व भोगवटादारांचीच राहणार असल्याचे महापालिकेने नमूद केले आहे. धोकादायक व अतिधोकादायक इमारतींची संपूर्ण माहिती महापालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. नागरिकांनी आपल्या परिसरातील इमारतींबाबत जागरूक राहून भविष्यातील दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेच्यावतीने केले आहे.पालिका क्षेत्रातील सर्व प्रभाग समिती कार्यालयांतर्गत असलेल्या धोकादायक इमारतींना आयुक्तांनी सूचित केल्यानुसार सदर इमारत रिक्त करणे बाबत उदघोषणा करून सूचना देण्यात येत आहे. तसेच सदर जागेचा वापर करू नये याबाबतचे सूचना फलक ही तेथे लावण्यात आले आहेत.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai