समाधान शिबीरातील सहभाग आणि दर्जेदार नियोजनावर भर द्या
- by Aajchi Navi Mumbai
- Jul 15, 2026
- 34
कोंकण विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल यांचे आदेश
नवी मुंबई : महसूल विभाग अधिक लोकाभिमुख, पारदर्शक आणि गतिमान करण्यासाठी तसेच शासनाच्या लोककल्याणकारी योजनांचा लाभ तळागाळातील शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवण्यासाठी राज्यात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान 22 जुलै ते 02 ऑगस्ट 2026 या कालावधीत राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या पूर्वतयारीचा आणि आयोजनाचा आढावा घेण्यासाठी कोंकण विभागीय महसूल आयुक्त रुबल अग्रवाल यांनी दूरदृष्यप्रणालीद्वारे बैठक घेतली.
या बैठकीसाठी कोंकण विभागातील सर्व जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, विभागीय आयुक्त कार्यालयाचे सर्व अपर आयुक्त, अपर जिल्हाधिकारी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी, तहसिलदार (महसूल) व संबंधित विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. बैठकीदरम्यान आयुक्त रुबल अग्रवाल यांनी प्रत्येक जिल्ह्याकडून आतापर्यंत झालेल्या तयारीची सविस्तर माहिती घेतली आणि हे अभियान सर्वसामान्य नागरिकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरेल या दृष्टीने काम करण्याच्या सूचना दिल्या. बैठकीत मार्गदर्शन करताना आयुक्त रुबल अग्रवाल यांनी स्पष्ट केले की, हे अभियान केवळ एक नावापुरते किंवा शासकीय सोपस्कार म्हणून पार पाडण्याचा कार्यक्रम नाही. प्रशासनाची पोहोच ही प्रत्येक विभागापर्यंत आणि शेवटच्या लाभार्थ्यापर्यंत अचूक झाली पाहिजे. मागील तीन महिन्यांत बहुतांश ठिकाणी अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष कार्यस्थळी जाऊन अत्यंत कष्टाने आणि कौतुकास्पद काम केले आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील शिबीराचे नियोजन हे दर्जेदार, पारदर्शक आणि सर्वसमावेशक असले पाहिजे, तसेच लाभार्थींची निवड अत्यंत काळजीपूर्वक, प्रामाणिकपणे आणि योग्य पद्धतीने झाली पाहिजे.
सध्या सुरू असलेली पावसाची स्थिती आणि दमट वातावरण लक्षात घेता आयुक्त रुबल अग्रवाल यांनी आरोग्य व खाद्यान्नाच्या बाबतीत अत्यंत कडक सूचना दिल्या आहेत. शिबिराच्या ठिकाणी येणाऱ्या नागरिकांसाठी नाश्ता व जेवणाची व्यवस्था करताना स्थानिक महिला बचत गट आणि सेवाभावी संस्थांना प्राधान्य द्यावे, जेणेकरून त्यांना हक्काचा रोजगार मिळेल आणि व्यवस्थाही उत्तम राहील. परंतु, पावसाळ्याचे दिवस असल्याने अन्नाचा दर्जा उत्तम असणे अनिवार्य आहे.
अभियानाच्या संपूर्ण कालावधीतील कोणत्याही एका दिवशी प्रत्येक विधानसभा मतदारसंघात हे अभियान राबविण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. या शिबिरांच्या माध्यमातून नागरिकांचे महसूल विभागाशी संबंधित प्रलंबित प्रश्न, विविध दाखले आणि शासकीय योजनांचे लाभ एकाच छताखाली तात्काळ देण्याचा प्रशासनाचा मानस असून, कोंकण विभागातील सर्व नागरिकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन कोकण विभागयी महसूल आयुक्त रुबल अग्रवाल यांनी यावेळी केले.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai