मतदारयादीवर 2538 हरकती व सूचना

नवी मुंबई ः राज्य निवडणूक आयोग यांच्या निर्देशानुसार 31 जानेवारी 2020 हा मतदार यादी ग्राह्य धरण्याचा दिनांक असून 09 मार्च 2020 रोजी प्रभागनिहाय प्रारुप मतदार यादी प्रसिध्द करण्यात आली आहे. या प्रारुप मतदार यादीवर हरकती व सूचना दाखल करण्यासाठी 09 मार्च ते 16 मार्च 2020 हा कालावधी जाहीर करण्यात आला होता. त्या अनुषंगाने 16 मार्च 2020 या अखेरच्या दिनांकापर्यंत प्रारुप मतदार यादी संदर्भात नागरिकांकडून 2538 हरकती व सूचना प्राप्त झाल्या.

या हरकतींमध्ये नागरिकांकडून एकाच प्रकारच्या हरकतीचे दोन वा तीन अर्ज देणार्‍या नागरिकांची संख्या जास्त आहे. यामध्ये दिघा विभागात 124, ऐरोली विभागात 222, घणसोली विभागात 367, कोपरखैरणे विभागात 302, वाशी विभागात 209, तुर्भे विभागात 761, नेरुळ विभागात 434 व बेलापूर विभागात 119 अशा प्रकारे एकूण 2538 हरकती / सूचना प्राप्त झाल्या आहेत.

या हरकती / सूचनांची पडताळणी करण्यासाठी महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी 3 मार्च 2020 रोजीच्या आदेशानुसार आठही विभागांकरीता विभाग कार्यालयनिहाय आठ समित्या गठीत केल्या आहेत. महानगरपालिकेचे विभागप्रमुख हे या समितीचे अध्यक्ष असून संबंधित विभागाचे कार्यकारी अभियंता हे सदस्य आहेत. ही समिती हरकती / सूचनांच्या अनुषंगाने प्रत्यक्ष पाहणी व शहानिशा करणार असून प्राप्त झालेल्या हरकती / सूचनांवर निर्णय घेणार आहे. तद्नंतर  प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी प्रसिध्द करण्यात येणार आहे.