सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास 250 रूपयांचा दंड

नवी मुंबई ः कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी महापालिकाही सतर्क झाली आहे. तंबाखू व तंबाखूजन्य धुम्रपानाचे पदार्थ यांची विक्री करणारी सर्व दुकाने व पान टपर्‍या बंद ठेवण्यात याव्यात असेही निर्देशित करण्यात आले आहे. तसेच सार्वजनिक ठिकाणी थुकणार्‍यांकडून 250 इतकी दंडात्मक रक्कम वसूली केली जात आहे. आजच्या दिवसात 48 व्यक्तींकडून 12 हजार इतकी दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आलेली आहे. 

15 मार्च रोजी आयुक्तांनी विशेष आदेशाव्दारे करोनाचा संसर्ग पसरू नये याकरिता खबरदारीची उपाययोजना म्हणून नागरिकांची गर्दी टाळण्यासाठी महानगरपालिका कार्यक्षेत्रातील सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, धार्मिक, शैक्षणिक, क्रीडा विषयक कार्यक्रमांची परवानगी रद्द केली आहे. सर्व 8 विभाग अधिकारी आणि दोन्ही परिमंडळ उपआयुक्त यांचे समवेत आढावा बैठक घेत महापालिका आयुक्त श्री. अण्णासाहेब मिसाळ यांनी काही ठिकाणी आदेशाचे उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आणून देत सार्वजनिक हिताच्या व नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने याबाबत कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. याशिवाय तंबाखू व तंबाखूजन्य धुम्रपानाचे पदार्थ यांची विक्री करणारी सर्व दुकाने व पान टपर्‍या बंद ठेवण्यात याव्यात असेही निर्देशित करण्यात आले आहे. 

यामध्ये महत्वाचे म्हणजे हा श्‍वसनसंस्थेशी निगडीत आजार असल्याने सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यावर असलेल्या बंदीकडे काटेकोर लक्ष देत सार्वजनिक ठिकाणी थुकणार्‍यांकडून 250 इतकी दंडात्मक रक्कम वसूली केली जात आहे. आजच्या दिवसात 48 व्यक्तींकडून 12 हजार इतकी दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आलेली आहे. कोरोना विषाणूचा प्रतिबंध रोखण्यासाठी घालण्यात येत असलेले निर्बंध हे नागरिकांचे आरोग्य हित नजरेसमोर ठेवून घालण्यात येत असून याकरिता सुजाण नवी मुंबईकर नागरिकांनी सर्वेतोपरी सहकार्य करावे आणि कोणत्याही ठिकाणी गर्दी करू नये तसेच शक्यतो कामाशिवाय घराबाहेर पडू नये असे आवाहन महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्या वतीने करण्यात येत आहे.