इराणचा कांदा एपीएमसीत आला

ग्राहकांकडून मात्र देशी कांद्यालाच पसंती
नवी मुंबई : उन्हाळी कांद्याचा साठा संपत चालला व नवीन पीक येण्यास विलंब लागणार असल्यामुळे देशात सर्वत्र कांद्याचा तुटवडा निर्माण होऊ लागला आहे. मागणीपेक्षा आवक कमी होत असल्यामुळे बाजारभाव वाढत आहेत. हे दर नियंत्रणात आणण्यासाठी व कांद्याची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी परदेशातून मोठ्या प्रमाणात कांद्याची आयात करण्यात आली आहे. जवळपास 600 टन कांदा सध्या जेएनपीटी बंदरात दाखल झाला आहे.
पावसाळ्याच्या सुरुवातीलाच शेतकर्यांजवळ केवळ 25 टक्के कांदा शिल्लक होता. त्यामुळं पावसाळ्यापासूनच कांद्याची कमतरता जाणवत होती. तरीही कांदा पुरेल अशी अपेक्षा शेतकर्यांसह व्यापार्यांनाही होती. मात्र पावसामुळं कांद्याच्या पिकाचं झालेलं नुकसान आणि त्यामुळं बाजारात निर्माण झालेली कांद्याची टंचाई या पार्श्वभूमीवर कांद्याचे भाव वाढले आहेत. हे दर नियंत्रणात आणण्यासाठी अनेक व्यापार्यांनी परदेशातून कांद्याची आयात सुरु केली आहे. नवी मुंबई एपीएमसी मार्केटमध्ये सोमवारी इराणचा 25 टन कांद्याचा एक कंटेनर दाखल झाला. इराणमधील या कांद्याला 50 ते 60 रुपये प्रति किलोचा भाव मिळाला. तर आपल्याकडील कांद्याला घाऊक बाजारात 60 ते 75 रुपये प्रति किलोप्रमाणे भाव मिळाला. बाजारात यापूर्वीही अनेकदा इजिप्त, अफगाणिस्तान, चीन, पाकिस्तानातून कांद्याची आयात करण्यात आली होती. सध्या परदेशातून कांद्याची आवक होत असली तरी ग्राहकांकडून मात्र देशी कांद्यालाच पसंती मिळत आहे. त्यामुळं देशी कांद्याला सध्या बाजारात 60 ते 75 रुपये प्रति किलोचा भाव मिळत आहे. तर परदेशी कांदा 50 ते 60 रुपये प्रति किलो दराने विकला जात आहे. सोमवारी मुंबई एपीएमसी मार्केटमध्ये देशी कांद्याच्या 100 गाड्यांची आवक झाली.