गॅस सिलिंडरच्या किमतीत वाढ

नवी मुंबई ः नव्या वर्षांच्या पहिल्याच दिवशी तेल कंपन्यांनी ग्राहकांना मोठा दणका दिला आहे. नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत तब्बल 17 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. मात्र, पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर असल्याने त्यातून ग्राहकांना थोडा दिलासा मिळाला आहे.     

गेल्या महिन्यात गॅस सिलिंडरच्या किंमतीत तब्बल 100 रुपयांनी वाढ करण्यात आली होती. व्यावसायिक वापरासाठी असलेल्या एलपीजी सिलिंडरच्या दरात वाढ करण्यात आली आहे. घरगुती वापराच्या सिलिंडरच्या किंमतीत वाढ करण्यात आलेली नाही. घरगुती वापरासाठी असलेल्या सिलिंडरच्या दरात गेल्या महिन्यात दोनदा वाढ करण्यात आली होती. गेल्या महिन्यात या दरात सुमारे 100 रुपयांनी वाढ झाली आहे. या दरवाढीमुळे 19 किलोच्या गॅस सिलिंडरसाठी 1349 रुपये मोजावे लागणार आहेत.

याआधी 15 डिसेंबरला या किमती 1332 रुपये होत्या. त्यामुळे एका सिलिंडरमागे 17 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. या दरवाढीमुळे कोलकातामध्ये व्यावसायिक वापराच्या सिलिंडरची किंमत 1410 रुपये झाली आहेत. चेन्नईत 1463050 तर मुंबईत 1280.50 रुपये झाली आहे. तसेच घरगुती वापराच्या 14.2 किलोग्रॅम सिलिंडरचे दर 694 रुपये झाले आहेत. तर 5 किलोच्या छोट्या सिलिंडरच्या दरात 18 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे.

दर महिन्याला तेल कंपन्यांकडून एलपीजी सिलिंडरच्या दराचा आढावा घेत त्यात बदल करण्यात येतात. प्रत्येक राज्यातील कर वेगवेगळे असल्याने प्रत्येक राज्यात सिलिंडरच्या दरात बदल होतात. तसेच तेल कंपन्यांकडून दररोज पेट्रोल- डिझेलच्या किंमतीच्या आढावा घेत त्यात बदल करण्यात येतात.  शुक्रवारी सलग पंचविसाव्या दिवशी पेट्रोल डिझेलच्या किमतीत बदल झालेले नाहीत. त्यामुळे पेट्रोल- डिझेल दरवाढीपासून ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. मुंबईत पेट्रोलचे दर 90.34 रुपये तर डिझलचे दर 80.51 रुपये आहेत.