....नाहीतर आयुक्तांचा पगार थांबवणार!
- by Aajchi Navi Mumbai
- Jan 24, 2026
- 47
प्रदुषणावरुन उच्च न्यायालयाची पालिकांना तंबी
मुंबई : राज्यात बांधकामांमुळे झालेल्या हवा प्रदुषणाची गंभीर दखल घेऊन योग्य त्या उपाययोजना करण्याचे आदेश सर्वच महापालिकांना मुंबई उच्च न्यायालयाने दिले होते. दरम्यान, न्यायालयाने नियुक्त केलेल्या समितीने मुंबई व नवी मुंबईतील 36 बांधकाम प्रकल्पांना भेट देऊन या सर्व ठिकाणी वायू प्रदूषणाच्या नियमांचे सर्रास उल्लंघन केल्याचे नमुद केले आहे. त्याची दखल घेऊन न्यायालयाने मुंबई आणि नवी मुंबई आयुक्तांना वैयक्तिक प्रतिज्ञापत्र दाखल करून प्रदूषण रोखण्यासाठी काय उपाययोजना करण्यात येत आहेत हे सांगण्याचे आदेश दिले होते. परंतु, पालिकेने शपथपत्र दाखल न केल्याने त्याची दखल घेत न्यायालयाने तातडीने उपाययोजना करुन त्याबाबतचा अहवाल 27 जानेवारीपर्यंत सादर करण्याचे आदेश दिले आहेत. यात कसूर झाल्यास वेतन रोखण्याची तंबी दिल्याने पालिकेच्या यंत्रणेची धावपळ सुरु झाली आहे.
राज्यात सध्या वायु प्रदुषणाने थैमान घातले असून सर्वत्र लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वानाच आरोग्याच्या समस्यांनी ग्रासले आहे. घसादुखी, खोकला, सर्दी, वायरल ताप याचे चक्र सुरु आहे. संध्याकाळी पसिरात प्रदुषणाची तिव्रता वाढलेली असते. थंडीमुळे धुरके पडले असे जाणवत असले तरी प्रत्यक्षात हवा प्रदुषणाने परिसर व्यापलेला असतो. पुर्वी वाहनांच्या धुरामुळे हवा प्रदुषित होत असे परंतु, सध्या मुंबई, नवी मुंबई तसेच एमएमआर क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर बांधकामे व पायाभुत सेवा सुविधा प्रकल्पांची कामे सुरु असल्याने धुळीची भर पडली आहे. याची स्वतः मुंबई उच्च न्यायालयाने दखल घेऊन एमएमआर क्षेत्रातील सर्वच महापालिकांना याबाबत तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश दिले होते. परंतु, याबाबत ठोस भुमिका न घेतल्याने शुक्रवारी झालेल्या सुनावणीत उच्च न्यायालयाने मुंबई व नवी मुंबई महापालिकेला फटकारले. समितीने दाखल केलेल्या अहवालातील प्रत्येक मुद्यावर तपशीलवार स्पष्टीकरण देण्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले होते. परंतु तपशीलवार माहितीचा अभाव असलेले प्रतिज्ञापत्र पालिकेच्या वतीने सादर करण्यात आले. त्यामुळे आणि पालिका आयुक्तांनी वैयक्तिक प्रतिज्ञापत्र दाखल न केल्याबाबत न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. तसेच, यातून आयुक्तांचे या प्रश्नाप्रतीचे गांभीर्य दिसून येते, असे न्यायालयाने सुनावले.
दुपारच्या सत्रात झालेल्या सुनावणीत न्यायालयाने पालिका आयुक्तांना या गंभीर परिस्थितीची दखल घेऊन प्रदुषण रोखण्यासाठी योग्य त्या उपाययोजना कराव्यात आणि त्याबाबतचे वैयक्तिक प्रतिज्ञापत्र 27 जानेवारीपुर्वी सादर करण्याचे आदेश पालिका आयुक्तांना दिले आहेत. न्यायालय येथेच थाबले नसून यात कसूर झाल्यास पालिका आयुक्तांचा पगार थांबवण्याचे आदेश देऊ असा सज्जड दम दिल्याने पालिका प्रशासन कामाला लागले आहे. त्यामुळे पालिका प्रदुषण रोखण्यासाठी नवी मुंबईत कोणत्या उपाययोजना करते याकडे नवी मुंबईकरांचे लक्ष लागलेआहे.
- नगररचना विभाग सक्रिय
नगररचना विभागाने दुपारपासून सर्वच अधिकाऱ्यांना बांधकाम प्रकल्पांचा आढावा घेण्यास पाठवले असून ज्या विकासकांनी दिलेल्या निर्देशांचे पालन केलेले नाही त्या सर्वांचे बांधकाम थांबवण्याचा निर्णय पालिका आयुक्तांनी घेतला आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai