करोना आजारावर 10 कोटींचा खर्च

पनवेल ः कोरोन साथरोग मुक्तीसाठी विविध स्तरावर प्रयत्न सुरु आहेत.पनवेल महापालिकेने आतापर्यंत 10 कोटी 30 लाख रुपयांचा खर्च केला आहे. पालिकेच्या अनेक सदस्यांनी पालिका प्रशासनाकडे याबाबत तपशील मागविला होता. सदस्य अरविंद म्हात्रे यांनी याबाबत माहिती अधिकाराचा वापर केल्यानंतर पालिकेने तपशीलवार खर्च जाहीर केला आहे.

पनवेल महापालिकेला जिल्हाधिकार्‍यांकडून आपत्ती व्यवस्थापन निधी 3 कोटी 55 लाख 63 हजार, जिल्हा नियोजन विकास निधीतून 75 लाख तसेच राष्ट्रीय नागरी आरोग्य मिशन अभियानांतर्गत 5 कोटी 45 लाख 17 हजार असे 9 कोटी 75 लाख 80 हजारांचा निधी प्राप्त झाला आहे. या निधीतून पालिकेने सर्वाधिक खर्च करोना काळजी केंद्र उभारणीसाठी तसेच भोजन व इतर साहित्यासाठी 4 कोटी 73 लाख 84 हजार रुपयांचा खर्च केल्याचे आयुक्त सुधाकर देशमुख यांनी जाहीर केले.

पालिका क्षेत्रातील र्निजतुकीकरणाच्या मनुष्यबळ व साहित्य खरेदीसाठी 1 कोटी 54 लाख 7 हजार तर करोना चाचणी,  सर्वेक्षण, ऑक्सिमीटर, थर्मामीटर, सॅनिटायझर यांच्या खरेदीसाठी 1 कोटी 14 लाख 26 हजार रुपये खर्च झाला आहे. अनेक सामाजिक सेवा संस्थांनी पालिकेला सॅनिटायझरचे मोफत वाटप केले होते. आतापर्यंत पनवेल पालिका क्षेत्रात 295 जणांचा करोनाने मृत्यू झाला आहे. त्यांच्या अंत्यविधीसाठी आणि मनुष्यबळासाठी पालिकेने एक कोटी 10 लाख 77 हजार रुपये खर्च केले आहेत.

पालिकेच्या कर्मचार्‍यांसाठी मुखपट्टया, हातमोजे, र्निजतुकीकरण फवारणीसाठी 32 लाख रुपये तर जनजागृती करण्यासाठी पालिकेने 72 लाख रुपये खर्च केला आहेत. टाळेबंदीच्या काळात अडकलेल्या मजुरांच्या जेवणावर आणि वाहनखर्चावर अडीच लाखांहून अधिक रक्कम खर्च केली आहे. प्रतिबंधित क्षेत्रात म्हणजेच इमारतींसमोर बांबू लावण्यासाठी पालिकेने कंत्राटदाराला 24 लाख 90 हजार रुपये अदा केले असून इतर खर्च 2 लाख 90 हजार  केला आहे. प्राप्त निधीव्यतिरिक्त पालिकेने 12 लाख 4 हजार रुपये स्वत:च्या तिजोरीतील खर्च केले आहेत.