मार्चमध्ये पनवेल येथे राज्यव्यापी साहित्य संमेलन
- by Aajchi Navi Mumbai
- Feb 11, 2026
- 26
कवी, गजलकारांना सहभागी होण्याचे संस्थांचे आवाहन
पनवेल : यंदाचे चौथे एकदिवसीय राज्यव्यापी मराठी साहित्य संमेलन पनवेल येथील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात होण्याचे संकेत मिळत आहेत. याकरिता सहभागी होऊ इच्छिणाऱ्या राज्यातील नामवंत कवी, गजलकारांनी आपल्या स्वरचित कविता, गजल 20 फेब्रुवारीपर्यंत पाठवाव्यात, असे आवाहन कांतीलाल प्रतिष्ठान रायगड आणि विश्वव्यापी मराठी साहित्य, सांस्कृतिक परिषदेचे अध्यक्ष कांतीलाल कडू यांनी केले आहे.
अभिजात मराठी भाषेच्या जतनाकरिता गेली अनेक वर्षे दोन्ही संस्था कांतीलाल कडू यांच्या नेतृत्वाखाली कवी संमेलने, गजल मुशायरा, चर्चासत्रांपासून मराठी भाषेचा गोडवा वाढविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. सकाळी वारकरी दिंडीतून ‘ज्ञानोबा-तुकोबा’ यांच्या गजरासह ग्रंथ दिंडीत टाळ, चिपळ्या, तुळशी वृंदावन डोक्यावर घेऊन पारंपरिक पद्धतीने नयनरम्य पालखी काढण्यात येईल. या परंपरेच्या माध्यमातून पनवेल शहराचे साहित्य, संस्कृती आणि सांस्कृतिक वारसा जतन केला जात आहे. सकाळी दिंडी, उद्घाटन सोहळा, एक-एक तासाच्या अवधीची दोन चर्चासत्रे, कवी आख्यान, गजल मुशायरा याशिवाय अन्य दोन प्रभावी कार्यक्रमांची रेलचेल संमेलनाच्या रूपरेषेत आखण्यात येणार आहे, अशी माहिती विश्वव्यापीचे उपाध्यक्ष गजलकार प्रशांत वैद्य (टिटवाळा) यांनी दिली. गेल्या वर्षापासून ज्येष्ठ कलावंत, साहित्यिकांची निवड करुन त्यांना ‘जीवन गौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे. येत्या आठवड्यात ही निवड केली जाईल. यंदापासून 15 हजार रोख रुपयांचे पारितोषिक, मानपात्र असे पुरस्काराचे स्वरूप असेल.
‘स्व. हरिश्चंद्र चांगू कडू’ या अवलियाच्या नावाने हा पुरस्कार देण्यात येतो. या संदर्भात निवड समितीचा निर्णय येत्या आठवड्यात घोषित करण्यात येईल, असे संस्थेचे सचिव गजलकार बंडू अंधेरे यांनी कळविले आहे. याशिवाय, राज्यव्यापी मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांची निवड, प्रमुख पाहुणे, स्वागताध्यक्ष तसेच सहभागी मान्यवरांची नावेही निश्चित केली जातील. राज्यातील मान्यवर साहित्यिक, रसिक, मराठीचे जाणकार आणि मराठी बांधवांना ही पर्वणी ठरणार असल्याने त्यांनी कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन कांतीलाल प्रतिष्ठानचे सचिव शर्वाय कडू यांनी केले आहे. लवकरच साहित्य संमेलन नियोजन समितीची बैठक संपन्न होणार आहे, असेही कळविण्यात आले आहे. संमेलन सर्वांसाठी विनामूल्य खुले असणार आहे. शिवाय दुपारच्या स्नेह भोजनाचीही व्यवस्था असणार आहे असे कळविण्यात आले आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai