सराईत चोरटे जेरबंद

नवी मुंबई : खारघर येथील मोबाइल दुकान फोडून महागडे मोबाईल, लॅपटॉप व रोख रक्कम असा एकूण सुमारे 50 लाखांचा मुद्देमाल चोरणार्‍या तिघांना मध्यवर्ती गुन्हे शाखेने अटक केली आहे. आरोपी हे सराईत असून त्यांच्यावर यापूर्वीही गुन्हे नोंद आहेत. त्यांच्याकडून वाहनचोरीचा गुन्हाही उकल झाला आहे.

शफिकउल्ला ऊर्फ सोनू अतिकउल्ला (वय 24), अयान ऊर्फ निसार ऊर्फ बिट्ट रफी अहमद शेख (वय 28) आणि इम्रान मोहम्मद ऊर्फ इम्मू बिंदू अन्सारी (वय 25) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नवे आहेत. तिघेही मूळ बिहार येथील असून घरफोडी आणि वाहन चोरीतील अभिलेखावरील आरोपी आहेत. त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून 11 सप्टेंबरपर्यंत त्यांना पोलीस कोठडी मिळालेली आहे.

30 ऑगस्ट रोजी खारघर येथील शिव इलेक्ट्रॉनिक्स या दुकानाचे शटर गॅस कटरने कापून या तिघंनी दुकानात प्रवेश केला. आतील 50 लाखांचे मोबाइल चोरी केले. विशेष म्हणजे चोरी करण्यापूर्वी दुकानातील सीसीटीव्हीचे डी.व्ही.आर. (ज्यात कॅमेराचे फुटेज जतन केले जाते) यंत्रही तोडून बरोबर घेऊन गेले होते. या प्रकरणी खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता. गुन्ह्याचा तपास खारघर पोलीस आणि गुन्हे शाखा समांतर करीत होते. प्रभारी गुन्हे शाखा उपायुक्त सुरेश मेंगडे यांनी अशा पद्धतीने चोरी करणारे अभिलेखावरील गुन्हेगारांची यादी काढून तांत्रिक तपास सुरू करा अशा सुचना दिल्या. गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक एन.बी. कोल्हटकर यांनी मुंबईतील गुन्हेगारांची तपासणी सुरू केली असता या तीन आरोपींची माहिती समोर आली. याच माहितीच्या आधारावर तांत्रिक तपास सुरू केल्यावर आरोपी हे धारावी परिसरात लपले असल्याची खबर मिळाली. या आधारावर पोलिसांनी सापळा रचून तिघांना अटक केली. या गुन्ह्यात वापरलेली टॅक्सी देखील आरोपींनी 14 ऑगस्ट रोजी कुर्ला येथून चोरी केलेली होती. तिन्ही आरोपींवर एकूण 17 गुन्हे यापूर्वी विविध पोलीस ठाण्यांत दाखल आहेत, अशी माहिती आयुक्त बिपिनकुमार सिंग यांनी दिली.

गुन्हा करताना आरोपी हे दोन-तीन दिवस अगोदर चारचाकी गाडी चोरत. याच गाडीतून एखादे दुकान हेरून त्याची रेकी करीत. त्यानंतर योग्य संधी साधूून चोरी करत असत. गुन्हा करताना कोणीही मोबाइल बाळगत नव्हते.