ऑनलाईन शिक्षणापासुन कोणत्याही विद्यार्थ्यांना वंचित ठेवू नये

फी भरणेसाठी तगादा लावू नये ः शिक्षणाधिकार्‍यांचे मुख्याध्यापकांना निर्देश

नवी मुंबई ः महानगरपालिका क्षेत्रातील खाजगी व्यवस्थापनाच्या विविध तक्रारीच्या अनुषंगाने आज अति. आयुक्त संजय काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली खाजगी शाळांतील मुख्याध्यापकांची सभा घेण्यात आली. सदर सभेसाठी शिक्षणाधिकारी योगेश कडुसकर उपस्थित होते. ऑनलाईन शिक्षणापासुन कोणत्याही विद्यार्थ्यांना वंचित ठेवू नये तसेच असमर्थ असणार्‍या पालकांना फी भरणेस सक्ती करू नये असे निर्देश त्यांनी सर्व मुख्याध्याकांना दिले.

कोरोना विषाणुच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे नवी मुंबई क्षेत्रातील सर्व शाळांचे ऑनलाईन शिक्षण सुरू आहे. लॉकडाऊन कालावधीत शाळांनी फी न भरल्यामुळे ऑनलाईन शिक्षणातुन विद्यार्थ्यांना कमी करणे, फी भरणेकरीता सक्ती करणे, फी न भरल्यामुळे विद्यार्थ्यांचे निकाल न देण, फी भरणेसाठी पालकांना सतत तगादा लावणे अशा विविध तक्रारी सद्यस्थितीत शिक्षण विभागाकडे येत असल्याबाबत अति. आयुक्त यांनी शाळांच्या निर्दशनास आणून दिले.

सद्यस्थितीत लॉकडाऊन असल्याकारणाने आर्थिक विवंचनेमुळे पालक फी भरण्यास असमर्थ आहेत, तरी शाळांनी पालकांची बाजु समजुन घेणे आवश्यक आहे. ऑनलाईन शिक्षणापासुन कोणत्याही विद्यार्थ्यांना वंचित ठेवता येणार नाही. तसेच सहानभुतीच्या दुष्टीकोनातुन फी भरण्यास असमर्थ असणार्‍या पालकांना फी भरणेस सक्ती करू नये अथवा फी भरणेबाबत शाळेने टप्पे करून द्यावेत असे अति. आयुक्त यांनी सुचविले तसेच प्रत्येक शाळेने आपल्या शाळेत तक्रार पेटी व सुचना पेटी शाळेच्या दर्शनी भागात लावण्यात यावी. प्रत्येक शाळेने कोणती फी आकारण्यात येते त्याबाबतचा फलक दर्शनीभागात लावण्यात यावा. शाळेबाबत वारंवार फी बाबत प्राप्त होणार्‍या तक्रारीच्या अनुषंगाने महापालिकेच्या वतीने एक समिती तक्रार करण्यात यावी व या समिती मार्फत ज्या शाळेची तक्रार प्राप्त होईल त्या शाळेत प्रत्यक्ष जाऊन सदर समिती तक्रारीबाबत चौकशी करेल असे निर्देश अति. आयुक्त यांनी दिले आहेत. तसेच सदर सुचनांचे पालन न केल्यास शाळेविरूध्द कडक कारवाई करण्यात येईल, असे सांगितले.

नवी मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाच्या वतीने देखील पालकांच्या तक्रारीची दखल घेणेबाबत विभागात तक्रार पेटी व सुचनापेटी तयार करण्यात आली आहे. तसेेच शिक्षण विभागाशी संबधित तक्रारींसाठी पालक/नागरिक 022-27577067 या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधू शकतात. शिक्षणाधिकारी यांनी उपस्थित सर्व मुख्याध्यापकांना अति आयुक्त यांनी दिलेल्या सुचनांचे पालन करण्याबाबत निर्देश दिले.