यंदा मोरबे ओव्हर फ्लो नाही

नवी मुंबई ः नवी मुंबई शहराला पाणीपुरवठा करणारे मोरबे धरण मागील तीन वर्षे ओव्हर फ्लो होत आहे. त्यामुळे धरणातून होणारा विसर्ग पाहण्यासाठी पर्यटक मोठी गर्दी करतात. मात्र हे दृष्य यंदा पाहायला मिळणार नाही. आतापर्यंत धरणात पाण्याची पातळी 86.4 मीटर असून ते ओव्हर फ्लो होेण्यासाठी अजून 1.6 मीटर पाण्याच्या पातळीची गरज आहे. आता पावसाने परतीची वाट धरल्याने धरण ओव्हर फ्लो होण्याची शक्यता कमी आहे. 

नवी मुंबई महानगरपालिका हद्दीत आणि सिडकोच्या कळंबोली, कामोठेच्या काही भागांत मोरबे धरणातून पाणीपुरवठा केला जातो. ही पाण्याची मागणी पूर्ण करण्यासाठी दररोज 430 एमएलडी पाणीपुरवठा करावा लागतो. मोरबे धरणाची पाणी साठवण्याची क्षमता साडे सहाशे दशलक्ष लीटर असून पाण्याची पातळी 88 मीटर आहे. हे धरण भरण्यासाठी  धरण परिसरात 3500 मिमी. पाऊस पडणे गरजेचे आहे. मात्र आतापर्यंत धरण क्षेत्रात  2836.80 मि.मी पावसाची नोंद झाली आहे.  आतापर्यंत पडलेल्या पावसाने धरणात 86.4 मीटर पाणी साठले आहे. धरणाची पाणीपातळी पूर्ण होण्यासाठी सरासरी 530 मिमी. पावसाची आवश्यकता आहे. पाऊस आता परतीच्या वाटेवर आहे. त्यामुळे यावर्षी धरण पुर्णपणे भरण्याची शक्यता फार कमी आहे. सलग तीन वर्षे ओव्हेर फ्लो होत असलेले धरण यंदा मात्र तुंडूंब भरणार नाही. त्यामुळे पालिकेला आतापासूनच पाण्याचे योग्य नियोजन करणे गरजेचे आहे. हे पाणी जरी ऑगस्ट 2021 पर्यंत पुरणार असले तरी नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करणे आवश्यक आहे. नाहीतर  पुढील वर्षी पावसाळा लांबला तर नवी मुंबईकरांना पाणीटंचाईचा सामना करावा लागेल. तर मुंबईला पाणी पुरवठा करणारे सर्वच तलाव ओव्हर फ्लो झाल्याने मुंबईकरांची मात्र पाणीचिंता मिटली आहे.