राज्यात मुसळधार पावसाची शक्तता

मेघगर्जनेसह बसरणार पाऊस ; हवामान खात्याचा इशारा

मुंबई ः बंगालच्या उपसागरात निर्माण झालेलं कमी दाबाचं क्षेत्र अधिक खोलवर गेल्याने त्याची दिशा पश्‍चिम-वायव्य अशी राहिल त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची शक्यता मुंबईच्या प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे मध्य महाराष्ट्रासह, विदर्भ तसेच कोकणात बर्‍याचशा ठिकाणी येत्या चार-पाच दिवसांत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. 

11 ऑक्टोबर रोजी विदर्भ, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण, गोव्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल. 12 ऑक्टोबर रोजी विदर्भ, मराठवाड्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल. 13 ऑक्टोबर रोजी विदर्भ, मराठवाडा, कोकण, गोव्यात मुसळधार पाऊस पडेल. 14 ऑक्टोबर रोजी मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण, गोव्यात मुसळधार पाऊस पडेल. मुसळधार ते अतिमुसळधार पावसाच्या काळात ताशी 70 किमी वेगाने वारे वाहतील. शिवाय समुद्र खवळलेला राहील. परिणामी, मच्छीमारांनी समुद्रात उतरू नये, असे आवाहन हवामान खात्याने केले आहे. येणार्‍या आठवड्यात (11 ते 17 ऑक्टोबर) महाराष्ट्रात कोकणासह आतल्या भागात पाऊस पूर्णत: सक्रीय राहण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. ढगांच्या गडगडाटासह जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे कापणीला आलेल्या पीकांवरती दाट प्रभाव होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.