रहेजा प्रकरणात हजार कोटी वसुलीसाठी शपथपत्र
- by Aajchi Navi Mumbai
- Apr 10, 2026
- 20
मेन्स प्रॉफिट व मोकळ्या जमीनीबाबत सिडको संचालक मंडळाचा निर्णय नाही
नवी मुंबई ः सिडको संचालक मंडळाने 4 फेब्रुवारी 2026 रोजी शासनाने दिलेल्या 16 नोव्हेंबर 2019 च्या आदेशाला अनुसरुन के.रहेजा यांना केलेले अवैध भूखंड वाटप नियमीत करण्याचा निर्णय घेतला आहे. शंकरन समितीच्या अहवालानुसार 50 कोटी रुपये व त्यावरील व्याज मिळून 262 कोटी सिडकोला मिळणार आहेत. परंतु, हा निर्णय घेताना सिडकोने मेन्स प्रॉफिट व मोकळ्या जमिनीबाबत कोणताच निर्णय न घेतल्याचे शपथपत्राद्वारे सर्वोच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्याने आता न्यायालयाच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सिडकोने के.रहेजा यांना 2003 साली केलेले भूखंड वाटप मुंबई उच्च न्यायालयाने अवैध ठरवून सदर भूखंड सहा महिन्यात सिडकोला परत करण्याचे आदेश दिले होते. सदर आदेशाला सर्वोच्च न्यायालयाने 22 जानेवारी 2015 रोजी जैसे थे चे आदेश दिले होते. के.रहेजा यांनी 6 डिसेंबर 2016 रोजी शासनाकडे अर्ज करुन आपले अवैध भूखंड वाटप सिडकोच्या 6 जून 2005 च्या धोरणानुसार नियमीत करण्याची मागणी केली होती. सदर प्रकरणी शासनाने नेमलेल्या समितीने के.रहेजा यांचे भूखंड वाटप सिडकोने 2014 च्या त्यांना प्राप्त झालेल्या बाजारभावाने नियमीत करावे असा अभिप्राय दिला होता. याबाबत शासनाने राज्याचे ॲडव्होकेट जनरल यांचा अभिप्राय घेऊन सदर अवैध भूखंड वाटप हे सिडकोच्या 6 जून 2005 च्या धोरणानुसार नियमीत करण्याचे सिडकोला आदेश दिले होते. परंतु, सिडको संचालक मंडळाने 2025 पर्यंत सदर आदेशाची अंमलबजावणी केली नाही.
सर्वोच्च न्यायालयाने 27 ऑक्टोबर 2025 रोजी याबाबत आदेश पारित करुन सिडकोला के.रहेजा यांच्या नियमीत करणाच्या अर्जावर स्वतंत्रपणे व गुणवत्तेवर आधारीत निर्णय घेऊन तो सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यास सांगितले. सिडकोने याबाबत 4 फेब्रुवारी 2026 रोजी आपल्या धोरणानुसार शंकरन समितीच्या अहवालानुसार 50 कोटी रुपये व व्याज असे स्विकारुन सदर भूखंड वाटप नियमीत करण्याचा निर्णय घेतला. याबाबत मुळ याचिकाकर्ते यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या शपथपत्रात आक्षेप घेत सदर निर्णय हा गुणवत्तेवर व स्वतंत्रपणे घेतला नसल्याचा आरोप केला आहे. सदर निर्णय हा शासनाच्या आदेशावर घेण्यात आला असून त्यात सिडकोचे मुख्य अर्थशास्त्र विभाग यांनी सूचित केलेल्या दरावर आधारित 457 कोटी रुपयांचा प्रस्ताव विचारात घेतला नसल्याचे तसेच सिडकोने के.रहेजा यांना देण्यात आलेल्या मोकळ्या जमिनीबाबत कोणताच निर्णय संचालक मंडळाने घेतला नसल्याची बाब शपथपत्रात नमुद केली आहे. त्याचबरोबर सिडकोने 2014 पासून सदर इनॉर्बिट मॉल भाड्याने देऊन कमावलेल्या उत्पन्नाबाबत कोणताही निर्णय घेतला नसल्याने हा निर्णय स्वतंत्र व गुणवत्तेवर आधारित नसल्याने रद्द करण्याची मागणी याचिकाकर्ते संजयकुमार सुर्वे यांनी आपल्या शपथपत्रात केली आहे. याचिकाकर्ते सुर्वे यांनी सिडकोला 2020 व 2024 ला पत्र देऊन के.रहेजा यांचेकडून मेन्स प्रॉफिट अंतर्गत 1000 कोटी रुपयांची मागणी करावी अशी विनंती केली होती. परंतु, सिडकोने याबाबत कोणतीच कारवाई केली नसल्याचे याचिकाकर्ते सुर्वे यांचे म्हणणे आहे. दरम्यान, सर्वोच्च न्यायालय सिडकोच्या या निर्णयावर कोणता आदेश देते किंवा सिडकोच्या निर्णयाप्रमाणे 262 कोटींचा प्रस्ताव स्विकारुन के.रहेजा यांना दिलासा देते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
- काय आहे मेन्स प्रॉफिट?
दिवाणी न्याय संहिता 1908 प्रमाणे जर एखाद्या प्रकरणी न्यायालयाने भूखंड वाटप किंवा ताबा अवैध ठरवला असेल तर अशा अवैध ताब्यातून मिळवलेले उत्पन्न हे मुळ भूखंडधारकाला मिळणे अपेक्षित आहे. याच नियमानुसार के.रहेजा यांचे भूखंड वाटप 2014 साली रद्द झाले असल्याने आणि सर्वोच्च न्यायालयाने जैसे थे चे आदेश दिले असल्याने या भूखंडातून मिळणाऱ्या उत्पन्नावर सिडकोचा अधिकार असल्याचा सुर्वे यांचा दावा आहे. त्यांनी या प्रकरणात मेन्स प्रॉफिट म्हणून 1000 कोटी रुपये के.रहेजा यांच्याकडून सिडकोला द्यावेत अशी मागणी केली आहे.
के.रहेजा यांचे भूखंड वाटप 2014 साली रद्द झाले असल्याने आणि सर्वोच्च न्यायालयाने जैसे थे चे आदेश दिले असल्याने या भूखंडातून मिळणाऱ्या उत्पन्नावर सिडकोचा अधिकार आहे. मी सिडकोला या प्रकरणात मेन्स प्रॉफिट म्हणून 1000 कोटी रुपये के.रहेजा यांच्याकडून वसूल करावेत यासाठी विनंती अर्ज केले आहेत. परंतु सिडकोने माझ्या अर्जावर कोणतीही कारवाई केली नाही, किंबहूना माझे अर्ज संचालक मंडळाच्या सल्लामसलतीसाठी सदर प्रस्तावात ठेवले नाहीत - संजयकुमार सुर्वे, सामाजिक कार्यकर्ते
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai