अडीच तासांनी वीज पुरवठा पूर्वपदावर

मुंबई : ग्रीड फेल झाल्यानं मुंबईसह एमएमआर भागात वीजपुरवठा खंडित झाल्याने एकच गोंधळ उडाला. मुंबईसह पूर्व आणि पश्‍चिम उपनगरातील वीज पुरवठा सुमारे अडीच तासांनी हळूहळू पूर्वपदावर आला आहे. दक्षिण मुंबई वरळी, लालबाग, माझगावसह आणि पश्‍चिम उपनगर, आणि पूर्व उपनगरातील नाहूर, भांडुप, मुलुंड, घाटकोपर इथला वीजपुरवठा सुरु झाला आहे. याशिवाय नवी मुंबईतील बेलापूर, खारघर, पनवेल, नेरुळ या भागातील वीजही परतली आहे. याशिवाय तिन्ही मार्गावरील लोकल सेवा, सिग्नल यंत्रणाही पूर्ववत झाली आहे. तसंच शासकीय कार्यलयांमधील वीजप्रवाहही पूर्वपदावर आला आहे. दरम्यान अभियंते आणि कर्मचारी युद्धपातळीवर काम करत असून पुढील तासाभरात वीजपुरवठा पूर्ववत होईल, अशी माहिती राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी नागपुरातील पत्रकार परिषदेत दिली.

मुंबई आणि एमएमआर रिजनमधील वीज पुरवठा खंडित झाल्याचा सर्वात मोठा फटका लोकल सेवा, रुग्णालयांना बसला. अनेक प्रवासी ट्रेनमध्येच अडकले. तर रुग्णालयात कोविड रुग्ण असल्याने वीज पुरवठा लवकरात लवकर पूर्ववत करण्याचं आव्हान होतं. परंतु हा तांत्रिक बिघाड मोठा असल्याने तो दुरुस्त करण्यासाठी सुमारे दोन तास लागले. त्यामुळे आता मुंबई आणि उपनगरं हळूहळू पूर्वपदावर येत आहेत.

तांत्रिक बिघाड नेमका कशामुळे?

महापारेषणच्या कळवा- पडघा ॠखड केंद्रात अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने ठाणे, कल्याण, पालघर आणि नवी मुंबईमधील वीज खंडित झाली. याचा लरीलरवश शषषशलीं मुळे मुंबई आणि मुंबई उपनगरातील वीज देखील खंडित झाली, अशी माहिती महावितरणने दिली. तसंच महापारेषण कंपनीचे अधिकारी-कर्मचारी युद्धपातळीवर काम करत आहेत. दीड ते दोन तासात वीज पूर्ववत सुरु होईल, असं महावितरणने सांगितलं होतं.

तातडीने चौकशीचे आदेश

ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी तांत्रिक बिघाडाची चौकशी होईल, अशी ग्वाही दिली. रुग्णालय आणि रेल्वे सुरु करणं हे आमचं प्राधान्य आहे. मात्र तांत्रिक बिघाड नेमका कसा झाला, ही चूक नेमकी कशामुळे झाली याची चौकशी केली जाईल, असं राऊत यांनी सांगितलं. तसेच वीज खंडित झाल्याच्या घटनेबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्याशी चर्चा केली. मुंबई तसंच मुंबई महानगर क्षेत्रातील वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी तातडीने सर्वतोपरी प्रयत्न करावेत अशा सूचना दिल्या. 

परीक्षांवरही परिणाम

अनेक भागात वीज गायब झाल्याने विद्यार्थ्यांच्या परीक्षांवरही परिणाम झाला आहे. मुंबई विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या ऑनलाइन परीक्षेचे पेपर सकाळी 11 ते 12 या वेळेत होते. मात्र मुंबईत वीज नसल्याने ज्या विद्यार्थ्यांना परीक्षा देणं शक्य होणार नाही त्यांनी चिंता करू नये. त्यांची परत परीक्षा घेतली जाईल असं विद्यापीठाकडून सांगण्यात आलं आहे. आज वीजपुरवठा खंडित झाल्याने परीक्षा होऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांची परीक्षा उद्या घेतली जाणार असल्याचं विद्यार्थ्यांना संबंधित महाविद्यालयाकडून सांगण्यात आलं आहे.