ट्रॅफिकला ब्रेक विकासाला वेग
- by Aajchi Navi Mumbai
- Feb 20, 2026
- 22
एमएमआरडीएच्या अर्थसंकल्पात कोट्यवधींची तरतूद ; तिसऱ्या मुंबईसाठी 4000 कोटींची तरतूद
मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) मुंबई, नवी मुंबईनंतर आता तिसऱ्या मुंबईसाठी चार हजार कोटींची तरतूद करत नव्या शहराची अर्थभरणी अर्थसंकल्पातून केली आहे. सन 2026-27 या आर्थिक वर्षात 48,072 कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पाला मंजुरी देण्यात आली. त्यातील तब्बल 87 टक्के निधी पायाभुत प्रकल्पांसाठी ठेवण्यात आला आहे. विशेष म्हणजे, सर्वसामान्यांकरिता कोंडीमुक्त प्रवासासाठी भुयारी रस्ते विकासासाठी साडेपाच हजार कोटींची तरतूद करून भविष्यातील प्रवासमार्ग अधोरेखित केला आहे.
गेल्या तीन वर्षांतील अथक परिश्रम, वित्तीय शिस्त यामुळे सन 2024-25मध्ये 7,468 कोटींच्या तुटीचा अर्थसंकल्प यंदाच्या आर्थिक वर्षात वित्तीय शिलकीचा झाला आहे. दरम्यान, 2025-26च्या सुधारित अंदाजाच्या तुलनेत हा 58.6 टक्के अधिक आहे. शहरातील वाढत्या गर्दीवर दीर्घकालीन उपाय म्हणून नवे शहर विकसित करण्यात येत आहे. नवी मुंबईनंतर तिसरी मुंबई विकसित करण्यासाठी एमएमआरडीएने अर्थसंकल्पात सुमारे 4,000 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. कर्नाळा-साई-चिरनेर पट्यात तिसऱ्या मुंबईचा विकास होणार आहे. ज्यात महत्त्वाचे म्हणजे रस्ते आणि द्रुतगती मार्ग प्रकल्पांसाठी 42,026 कोटींची मोठी तरतूद आहे. रायगड पेण विकास केंद्रासाठी 500 कोटी आणि खारबाव बिझनेस पार्कसाठी 100 कोटींची तरतूद आहे. यांचा समावेश मुंबई 3.0 मध्ये आहे. गेल्याच आठवड्यात तिसऱ्या मुंबईसाठी राज्य सरकारने भूसंपादन-भूवाटप धोरणाचा शासन निर्णय जाहीर केला आहे. महामुंबईत सुरू असलेल्या विविध प्रकल्पांसाठी 42,026.14 कोटींची तरतूद अर्थसंकल्पात आहे.
मेट्रो प्रकल्पांसाठी सर्वाधिक 13,838.88 कोटींची तरतूद आहे. यात उपनगरांतील वडाळा - कासारवडवली, स्वामी समर्थ नगर - कांजुरमार्ग, ठाणे - भिवंडी - कल्याण आणि दहिसर - मिरा भाईंदर या मार्गिकांचा समावेश आहे. रस्ते व उड्डाणपूल प्रकल्पांसाठी 12,816.53 कोटी देण्यात येणार आहेत. मुंबई एकात्मिक भुयारी रस्ते प्रकल्प अर्थात वांद्रे - वरळी सागरी सेतू ते छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ टर्मिनल दोनसाठी 24 हजार कोटींची प्रशासकीय मान्यता आहे. यासाठी यंदा 1,189 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. ठाणे - बोरिवली आणि ऑरेंज गेट - मरीन ड्राइव्ह यांसारख्या भूमिगत बोगदा प्रकल्पांसाठी एकूण 5,543.51 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. ‘एमएमआरडीए’ कर्जातून 23,711 कोटींचा निधी उभारणार आहे. जमिनींच्या व्यावसायिक वापरातून सुमारे 11,177.95 कोटींचे उत्पन्न आणि शहरी परिवहन निधीतून 6,368.42 कोटी मिळवण्याची अपेक्षा एमएमआरडीएने व्यक्त केली आहे.
रस्ते, महामार्ग, द्रुतगती मार्ग
- मुख्य वाहतूक मार्गांची जोडणी आणि मल्टी-रिंग रोड नेटवर्क 12,816.53
- अटल सेतू ते मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग जोडणी - 603
- आनंद नगर ते साकेत उन्नत मार्ग - 880.12
- ठाणे कोस्टल रोड (बाळकुम-गायमुख) 1,025.77
- फाउंटन हॉटेल ते भाईंदर उन्नत मार्ग - 75
- कल्याण रिंग रोड - 600
- वरळी-शिवडी उन्नत कॉरिडॉर -936.07
- विस्तारित मुंबई शहरी पायाभूत सुविधा प्रकल्प - 2,362.20
- मुंबई-वाढवण द्रुतगती मार्ग कॉरिडॉर (उत्तन-विरार सी लिंक) - 2,000
- मुंबई ते समृद्धी द्रुतगती मार्ग : साकेत ते आमणे जोड रस्ता - 500
- पूर्व मुक्तमार्ग विस्तार (छेडा नगर, घाटकोपर ते ठाणे) - 1,106.75
- कल्याण-मुरबाड ते बदलापूर रस्ता (वालधुनी नदीलगत उन्नत रस्ता) - 200
- गायमुख ते पायगाव खाडी पूल -682.10
- कासारवडवली, ठाणे ते खारबाव खाडी पूल - 840.71
- कोलशेत, ठाणे ते काल्हेर, भिवंडी खाडी पूल - 105.51
- राष्ट्रीय महामार्ग 4 ते काटई नाका उन्नत रस्ता - 900
- (आकडे कोटी रुपयांत)
- मेट्रो 12 (कल्याण ते तळोजा ) -1,054.54
- पायाभूत सुविधा
- भुयारी-उन्नत रस्त्यांसाठी ---5,543.51
- ऑरेंज गेट ते मरिन ड्राइव्ह कोस्टल रोड भुयारी मार्ग ---1,250
- मुंबई इंटिग्रेटेड टनेल ---1,189
- गायमुख ते फाउंटन हॉटेल भुयारी मार्ग ---75
- ठाणे ते बोरिवली चार पदरी भुयारी मार्ग ---3,029.51
- (आकडे कोटी रुपयांत)
घरे आणि पुनर्वसन
- झोपडपट्टी पुनर्वसन आणि गृहनिर्माण ---731.33
- माता रमाबाई आंबेडकर नगर एसआरए ---551
- पुनर्वसन व पुनर्स्थापना ---150
- परवडणारी भाडेतत्त्वावरील घरे ---30.33
- (आकडे कोटी रुपयांत)
यंदाचा शिलकीचा अर्थसंकल्प हा वित्तीय शिस्त, भांडवल उभारणी आणि पायाभूत सुविधा अंमलबजावणीचा परिणाम आहे. वाहतूक जोडणी विस्तारत असताना, मुंबई 3.0च्या माध्यमातून विकासाचे विकेंद्रीकरण करण्यात येत आहे. या अर्थसंकल्पामुळे आर्थिक ताणाच्या टप्प्यातून आर्थिक स्थैर्याकडे जात असताना विकासही होत आहे. -डॉ. संजय मुखर्जी, आयुक्त, एमएमआरडीए
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai