30 वर्षापेक्षा जुन्या इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट बंधनकारक

31 डिसेंबरपूर्वी अहवाल सादर करण्याचे आवाहन

नवी मुंबई ः शहरातील जुन्या इमारतींचा धोका लक्षात घेता महापालिकेने आता तीस वर्षांपेक्षा जुन्या इमारतींचे, घरांचे संरचनात्मक परीक्षण (स्ट्रक्चरल ऑडिट) करणे बंधनकारक केले आहे. त्यानुसार सदर इमारतींचे 31 डिसेंबरपूर्वी स्ट्रक्चरल ऑडिट करुन अहवाल सादर करण्याचे आवाहन पालिकेने केले आहे. महापालिकेने नेमून दिलेल्या संरचना अभियंत्यांच्या माध्यमातून परीक्षण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. याप्रकरणी जी संस्था, मालक, भोगवटादार टाळाटाळ करतील त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. 

नवी मुंबई शहराचा झपाट्याने विकास व विस्तार होत आहे. यात इमारतींची संख्याही वाढत आहे. नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रामधील धोकादायक इमारतींचे सन 2020-2021 या वर्षासाठी सर्वेक्षण करण्यात आले आहे. सर्वेक्षणानंतर एकूण 457 इमारती धोकादायक इमारती म्हणून घोषित करण्यात आलेल्या आहेत. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम चे कलम 265 (अ) नुसार ज्या इमारतींचा वापर सुरू होऊन 30 वर्षापेक्षा अधिक काळ लोटला आहे, अशा इमारतींचे नवी मुंबई महानगरपालिकेकडे नोंदणी केलेल्या बांधकाम अभियंत्याकडून किंवा संरचना अभियंत्याकडून संरचना परिक्षण करून घेणे अनिवार्य आहे. 30 वर्षापेक्षा जास्त काळ हा इमारतीचा वापर किंवा इमारतीस भोगवटा प्रमाणपत्र (पूर्ण अथवा अंशतः) क्षेत्रफळ वापराखाली आणले गेले अशा दिवसापासून मोजावयाचा आहे. नेमलेल्या संरचना अभियंत्याने शिफारशी केलेली दुरूस्तीची कामे पूर्ण झाल्याचे व ते बांधकाम सुस्थितीत असल्याचे प्रमाणपत्र नवी मुंबई महानगरपालिकेकडे सादर करण्याची सूचना पालिकेने केली आहे. याप्रकारे संरचना परिक्षण करण्याचे उत्तरदायित्व जी संस्था,मालक,भोगवटादार पार पाडण्यास टाळाटाळ करतील त्यांना रूपये 25 हजार रक्कम अथवा सदर मिळकतीच्या वार्षिक मालमत्ता कराची रक्कम, यातील जी जास्त असेल, तितक्या रककमेचा दंड ठोठविण्यात येणार आहे. नवी मुंबई महानगरपालिकेने संरचनात्मक परिक्षक (स्ट्रक्चरल इंजिनियर) यांची यादी नवी मुंबई महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिलेली आहे. संरचनात्मक परिक्षण दिनांक 31 डिसेंबर 2020 पूर्वी पूर्ण करून याबाबतचा अहवाल संबंधित विभागाचे सहाय्यक आयुक्त तथा विभाग अधिकारी आणि सहाय्यक संचालक नगररचना, नवी मुंबई महानगरपालिका यांचेकडे सादर करण्याचे आवाहन पालिकेने केले आहे.

नागरिकांनी धोकादायक इमारतींचा,घरांचा रहिवास वापर तात्काळ थांबवावा, असे आवाहन महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी केले आहे. अन्यथा दुर्देवी अपघात घडल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबधितांची राहील, याची नोंद घेण्यात यावी असेही सूचित करण्यात आले आहे.