मालमत्ता नोंदणी शुल्काच्या वाढीचा प्रस्ताव
- by Aajchi Navi Mumbai
- Jul 18, 2026
- 20
मंजुरी मिळाल्यास 20 हजारांचा भार
मुंबई ः मुंबईसह राज्यभरात मालमत्ता नोंदणीसाठी आकारण्यात येणाऱ्या कमाल नोंदणी शुल्कात वाढ करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारच्या विचाराधीन असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. सध्या लागू असलेली 30 हजार रुपयांची मर्यादा 50 हजार रुपयांपर्यंत वाढवण्याची शक्यता आहे. या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यास मालमत्ता व्यवहारांचा खर्च वाढू शकतो. नोंदणी व मुद्रांक विभागाच्या सूत्रांनुसार, नोंदणी शुल्कात जवळपास दशकभर कोणताही बदल करण्यात आलेला नाही. दरम्यानच्या काळात मालमत्तांच्या किमती वाढल्या, व्यवहारांचे स्वरूप बदलले आणि विभागाचा प्रशासकीय खर्चही वाढला आहे. त्यामुळे शुल्काचा फेरआढावा घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
सध्या मालमत्तेच्या मूल्यापेक्षा स्वतंत्रपणे कमाल नोंदणी शुल्क 30 हजार रुपये आकारले जाते. मात्र, प्रस्तावित बदलानुसार ही मर्यादा 50 हजार रुपयांपर्यंत नेण्याचा विचार सुरू आहे. हे वाढीव शुल्क सर्व व्यवहारांवर लागू करायचे की केवळ ठरावीक उच्च मूल्याच्या मालमत्तांवर, याबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. विविध पर्यायांवर सरकारकडून चर्चा सुरू असल्याचे सांगितले जात आहे. रिअल इस्टेट क्षेत्रातील जाणकारांच्या मते, प्रस्ताव लागू झाल्यास मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे आणि इतर मोठ्या शहरांमधील घरखरेदीदारांच्या व्यवहार खर्चात वाढ होऊ शकते. विशेषतः उच्च मूल्याच्या निवासी आणि व्यावसायिक मालमत्तांच्या व्यवहारांवर याचा अधिक परिणाम होण्याची शक्यता आहे.
मुंबईतील मालमत्ता नोंदणी व्यवहारांमध्ये गेल्या काही महिन्यांत सातत्याने वाढ होत असून, राज्याला मुद्रांक शुल्कातूनही चांगला महसूल मिळत आहे. अशा पार्श्वभूमीवर बिगर-कर महसूल वाढवण्यासाठी नोंदणी शुल्क वाढीचा प्रस्ताव पुढे आल्याचे बोलले जात आहे. मात्र, हा प्रस्ताव अद्याप अंतिम टप्प्यात पोहोचलेला नाही. राज्य सरकारकडून अधिकृत मंजुरी आणि अधिसूचना जारी झाल्यानंतरच नवे शुल्क लागू होणार आहे. त्यामुळे सध्या घर खरेदीचा व्यवहार करणाऱ्यांनी अधिकृत निर्णयाची प्रतीक्षा करणे आवश्यक आहे.
- वर्षभरात 1,50,293 मालमत्तांची नोंदणी
2025 मध्ये, मुंबईत वर्षभरात 1,50,293 मालमत्तांची नोंदणी झाली होती, तर यावर्षी जानेवारी ते जून 2026 या कालावधीत मुंबईत 80,330 नोंदण्या झाल्या आहेत. घर, जमीन, दुकान किंवा इतर कोणत्याही मालमत्तेच्या व्यवहारासाठी खरेदीदाराला अनिवार्य नोंदणी शुल्क भरावे लागते. हे शुल्क भरल्यानंतरच नोंदणी प्रक्रिया पूर्ण होते. त्यामुळे, शुल्कवाढ मंजूर झाल्यास, खरेदीदारावर 20,000 चा अतिरिक्त भार पडेल.
- यंदा महसूलातवाढ
जून 2026 मध्ये मुंबईत 13,413 मालमत्तांची नोंदणी झाली. ही संख्या मागील सर्व जून महिन्यांतील घरविक्रीपेक्षा जास्त आहे. जून 2025 च्या तुलनेत गेल्या महिन्यात 1,851 मालमत्तांची अधिक नोंदणी झाली आहे. जून 2026 मध्ये, राज्य सरकारला मुद्रांक शुल्क आणि नोंदणी शुल्काच्या स्वरूपात 1,085 कोटी रुपयांचा महसूल मिळाला, जो गेल्या वर्षीच्या याच कालावधीपेक्षा 50 कोटी रुपयांनी अधिक आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai