आणखी एका तरुणाला वाचविण्यात पोलिसांना यश

नवी मुंबई : अभ्यासात लक्ष लागत नसल्याने आलेल्या नैराष्येतून कीटकनाशक पिऊन वाशी खाडीमध्ये उडी टाकून आत्महत्या करण्याच्या प्रयत्नात असलेल्या तरुणाला वाशी पोलिसांनी स्थानिक मच्छिमारांच्या मदतीने वाचविल्याची घटना सोमवारी रात्री घडली. चिराग ठाकूर (20) असे या तरुणाचे नाव असून पोलिसांनी त्याला पुढील उपचारासाठी नेरुळ येथील डी.वाय.पाटील रुग्णालया दाखल केले आहे. दरम्यान, आत्महत्या करण्यासाठी वाशी खाडी पुलावरुन उडी टाकणार्‍यांची गत पंधरा दिवसांतील ही तिसरी घटना असून पोलिसांनी या तिघांना वाचविले आहे.   

या घटनेतील चिराग ठाकुर हा तरुण चेंबूर येथे रहाण्यास असून सध्या तो इंजिनियरिंगच्या तिसर्‍या वर्षात शिकत आहे. मात्र चिरागचे अभ्यासात लक्ष लागत नसल्याने त्याने सोमवारी रात्री 7.30 वाजण्याच्या सुमारास नैराष्येतून कीटकनाशक पिऊन खाडी मध्ये उडी टाकून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. याबाबतची माहिती बिट मार्शल हेड कॉन्स्टेबल साबणे व पोलीस नाईक पाटील यांना मिळताच त्यांनी वाशी खाडीपुलावर धाव घेतली. त्यानंतर त्यांनी स्थानिक मच्छीमार बाळकृष्ण भगत यांच्या मदतीने सदर चिराग ठाकुर याला खाडीच्या पाण्यातून सुखरुपपणे बाहेर काढले. मात्र चिरागने किटकनाशक घेतल्याचे समजल्यानंतर त्याच्या आरोग्याला काही धोका होऊ नये यासाठी पोलिसांनी त्याला तात्काळ नेरुळ येथील डॉ.डी.वाय.पाटील हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल केले. त्यानंतर त्याला त्याच्या पालकांच्या स्वाधीन केले. एकुलता एक असलेल्या चिराग ठाकुर याला पोलिसांनी वाचविल्याने त्याच्या वडीलांनी वाशी पोलिसांचे मनापासून आभार मानले आहेत. वाशी खाडी पुलावरुन आत्महत्या करण्याच्या प्रकारात वाढ होत असल्याने पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे.  

चौकट  

गत 26 सफ्टेंबर रोजी वाशी खाडीत आत्महत्या करण्याच्या प्रयत्नात असलेल्या 18 वर्षीय तरुणीला वाशी पोलिसांनी स्थानिक मच्छिमारांच्या मदतीने वाचवून तिला तिच्या पालकांच्या स्वाधीन केले होते. त्यानंतर दोन दिवसातच मानखुर्द येथे रहाणाऱया मनोज कांबळे या व्यक्तीने घरगुती कारणावरुन वाशी खाडी पुलावरुन उडी टाकून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. त्याला देखील पोलिसांनी स्थानिक मच्छिमारांच्या मदतीने वाचविले होते.