समित्यांद्वारे पालिका आयुक्तांवर दबावतंत्र!
- by Aajchi Navi Mumbai
- Feb 27, 2026
- 28
आरोग्य, नगररचना व अभियांत्रिकी विभागाची चौकशी
नवी मुंबई ः सत्ताधारी पक्षाचे नगरसेवक मुनावर पटेल यांनी नगररचना, आरोग्य, अभियांत्रिकी व इतर सर्व कामाकाजाची चौकशी करण्यासाठी पाच सदस्यीय तदर्थ समिती नेमण्याची केलेली मागणी पहिल्या सर्वसाधारण सभेत मंजुर झाली आहे. या समितीद्वारे पालिका आयुक्तांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप विरोधीपक्षाने केला आहे. दरम्यान, पालिका आयुक्तांनी समितीचे कार्यक्षेत्र, अधिकार, मर्यादा आणि कामकाजाची पद्धत स्पष्ट नसल्याचे यावेळी नमूद केले.
नवी मुंबई महानगरपालिकेत प्रशासकीय काळात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप वनमंत्री गणेश नाईक व त्यांचे सहकारी गेली अनेकवर्षे करत आहेत. गेली काही वर्षे गणेश नाईक त्यांच्या कार्यकर्त्यांची कामे व्हावीत म्हणून नियमीत महापालिका आयुक्तांची भेट घेत असत. मंत्री झाल्यानंतर त्यांचे महापालिकेत येणे कमी झाले आहे परंतु, पालिकेच्या अनेक विभागात भ्रष्टाचार असल्याचे ते अनेकदा बोलून दाखवत आहेत.
नाईकांच्या रडारवर सध्या नगररचना विभाग असून नगरसेवकांनी प्रस्तावित केलेले विकास आराखड्यातील आरक्षण विकासकांना हाताशी धरुन त्यावर बांधकाम परवानग्या दिल्याचा आरोप गणेश नाईक सध्या करत आहेत. गेल्या जनता दरबारातही नाईकांनी याबाबत आपले जाहीर मतप्रदर्शन केले. सर्वसाधारण सभेने यावेळी लोकप्रतिनिधी मुनावर पटेल व शैला पाटील यांनी महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949, कलम 31 अन्वये अभियांत्रिकी, नगररचना, आरोग्य विभाग व इतर कामकाजाची चौकशी करण्यासाठी सादर केलेले तदर्थ समिती प्रस्ताव मंजुर केले आहे. या समित्या पाच सदस्यांच्या असणार असून त्यांनी कामकाजाची चौकशी करुन अहवाल सादर करावयाचा आहे.
या संदर्भात आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी समितीचे कार्यक्षेत्र, अधिकार, मर्यादा आणि कामकाजाची पद्धत स्पष्ट असणे अत्यावश्यक असल्याचे नमूद केले. सध्याच्या प्रस्तावात ही स्पष्टता दिसत नसल्याची नोंद त्यांनी केली. ‘समितीने आपले काम करावे; मात्र अधिकाऱ्यांवर अनावश्यक मानसिक ताण येणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. अन्यथा नियमित प्रशासकीय कामकाजावर परिणाम होऊ शकतो,’ असा इशाराही आयुक्तांनी दिला. आवश्यक माहिती लोकप्रतिनिधींना व सर्वसामान्यांना माहिती अधिकाराद्वारे उपलब्ध होत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. त्यांच्या या भूमिकेमुळे तदर्थ समितीच्या स्वरूपाबाबत अधिक स्पष्टता देण्याची मागणी सभागृहात पुढे ठेवण्यात आली आहे. दरम्यान, सत्ताधाऱ्यांचा आयुक्तांवर दबाव टाकून त्यांना आवश्यक असलेली कामे करुन घेण्याचा हा प्रकार असल्याचा आरोप विरोधीपक्षाने केला आहे. भविष्यात या समितीच्या कामकाजामुळे सत्ताधारी व आयुक्त यांच्यात वितुष्ट निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai