खाजगी रुग्णालयांबरोबर केलेला करार रद्द करा

नगरविकास विभागाचे पनवेेल पालिकेला निर्देश

पनवेेल : कोरोनाबाधित रूग्णांवर उपचारासाठी पनवेल महापालिकेने खासगी रुग्णालयांबरोबर केलेला करार तातडीने रद्द करण्यात यावा व सर्व कोरोनाबाधित रूग्णांवर महात्मा फूले जन आरोग्य योजनेअंतर्गत रुग्णसेवा पुरविण्यात याव्यात, असे निर्देश नगरविकास विभागाने पनवेेल महापालिकेला दिले आहेत. महात्मा फूले जन आरोग्य योजना ही सर्वांसाठी लागू करण्यात आली असून या योजनेच्या अंतर्गत विविध रुग्णालये संलग्न आहेत. त्यामुळे महापालिकेने आपल्या स्थरावर या योजनेअंतर्गत खाजगी रुग्णालयाशी करार करण्याची आवश्यकता नसल्याने नगरविकास विभागाने पनवेेल महापालिकेला कामोठ्यातील एमजीएम रुग्णालय आणि नेरूळ येथील डी. वाय. पाटील रूग्णालय, यांच्यासोबत केलेला करार रद्द करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. 

कोरोनाबाधितांवर उपायोजना करण्यासाठी पनवेल महापालिकेतर्फे एमजीएम हॉस्पिटल कामोठे व डी.वाय. पाटील रुग्णालय, नेरूळ या खाजगी रूग्णालयांमध्ये रूग्णांवर उपचार करण्यासाठी दरमहा किमान दीड कोटी रूपये प्रत्येकी दोन्ही रूग्णालयांवर खर्च करण्यात येत असल्याचा आरोप नगरसेवक अरविंद म्हात्रे यांनी केला होता. स्थायी समितीच्या बैठकीमध्येही त्यांनी यासंदर्भात प्रश्‍न उपस्थित केला होता. महात्मा फूले जन आरोग्य योजना दोन्ही रुग्णालयांमध्ये उपलब्ध असून सुद्धा त्यामधून खर्च न करता खाजगीरित्या सदर खर्च करण्यात येत आहे. यामध्ये जनतेच्या पैशाची उधळण होत असल्याने याबाबत चौकशी करण्याची मागणी अरविंद म्हात्रे यांनी केली होती.

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर खासगी रुग्णालयातील 80 टक्के खाटा अधिगृहीत करुन विहित दराने उपचार करणे अनिवार्य आहे. साधारणपणे कोविडमध्ये 80 टक्के रुग्ण हे सौम्य लक्षणे असणारी असतात. अशा रुग्णांना कोविड सुविधा केंद्र किंवा घरामध्ये क्वारन्टाईन करून गंभीर लक्षणे असणार्‍या रुग्णांना मुबलक प्रमाणात खाटा व इतर सुविधा उपलब्ध होऊ शकतात. महात्मा फुले जन आरोग्य योजना सर्वांसाठी लागू करण्यात आली असून या योजनेअंतर्गत विविध रुग्णालय संलग्न असून कोणत्याही महानगरपालिकेने खाजगी रुग्णालयाशी वेगळयाने करार करण्याची आवश्यकता नाही. तसेच अशा प्रकारच्या करारामध्ये रुग्णालयाच्या देखभालीचा तत्सम खर्च आकारला जात असतो. त्यामुळे रुग्णांवर होणार्‍या खर्चाची द्विरुक्ती होते. त्यामुळे पनवेल महानगरपालिकेने एम.जी.एम. रुग्णालय, कामोठे व डी.वाय. पाटील रुग्णालय, नवी मुंबई यांच्यासोबत केलेला करार रद्द करावा, असे पत्र नगरविकास विभागाने पनवेेल महापालिकेला दिले आहे.