सीआरझेडच्या आदेशाची पुर्तता न करता प्रस्ताव मागे
- by Aajchi Navi Mumbai
- Mar 13, 2026
- 22
प्रकल्प नियोजन बदलल्याचा प्रवर्तकाचा दावा
नवी मुंबई : नेरूळ सेक्टर 60 मधील पॉकेट डी व ई वर मिस्त्री कन्स्ट्रक्शन कंपनी बांधतअसलेला गृहप्रकल्प पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. मागील बैठकीत सीआरझेड प्राधिकरणाने गृहप्रकल्पाचे सद्यस्थिती व न्यायालयीन प्रकरणाची माहिती सादर करण्यास सल्लागारास सांगितले होते. परंतु, या बैठकीत प्रकल्प सल्लागाराने प्रस्तावच मागे घेतल्याने या प्रकल्पाच्या मंजुरीवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. दरम्यान, हा गृहप्रकल्प नवी मुंबईतील पर्यावरणप्रेमींच्या रडारवर असल्याने त्याचे भवितव्य अधांतरी असल्याचे बोलले जात आहे.
मिस्त्री कन्स्ट्रक्शन कंपनी बांधत असलेला गृहप्रकल्प हा सुरुवातीपासूनच वादात सापडला आहे. या गृहप्रकल्पावर अदानी समुहाचे फलक असल्याने त्यास वेगळी वागणुक मिळत असल्याचे बोलले जात आहे. सदर क्षेत्र हे नवी मुंबई महापालिकेच्या कक्षेत असतानाही या गृहप्रकल्पाला सिडकोने दिलेली बांधकाम मंजुरी ही वादात सापडली आहे. सदर गृहप्रकल्प सीआरझेड-2 कक्षेत येत असून त्यास नवीन सुधारित अधिसूचनेचा लाभ दिला असल्याची चर्चा दबक्या आवाजात आहे. वास्तवित पाहता, पर्यावरण व हवामान बदल मंत्रालयाच्या 15 ऑगस्ट 2018 च्या अधिसूचनेनुसार 1 चटई निर्देशांक गृहित धरुन मंजुरी देणे अपेक्षित होते. परंतु, सिडकोच्या नगररचना विभागाने संबंधित गृहप्रकल्पाला 1.5 चटईक्षेत्र मंजुर केल्याचे बोलले जात आहे. या भुखंडावरील प्रकल्प प्रवर्तकाने तोडलेली झाडेही त्यावेळी वादात सापडली होती.
या गृहप्रकल्पाला 25 ऑगस्ट 2023 च्या अधिसुचनेला अनुसरुन सुधारित परवानगी मिळण्यासाठी प्रकल्प प्रवर्तकाने महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाकडे अर्ज केला होता. या नवीन अधिसूचनेनुसार भरतीरेषेची मर्यादा ही 100 मीटर वरुन 50 मीटरपर्यंत करण्यात आली. परंतु, सिडकोने यापुर्वीच हा फायदा विकासकाला दिल्याची चर्चा दबक्या आवाजात आहे. या गृहप्रकल्प क्षेत्राला लागूनच फ्लेमिंगो पक्षांचा अधिवास असल्याने त्या क्षेत्रालगतच्या सर्व गृहप्रकल्पांना संबंधित विभागाची परवानगी घेणे गरजेचे आहे. महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाने (सीआरझेड)ने आपल्या 193 व्या बैठकीत या प्रकल्पाच्या सल्लागाराला कठोर निर्देश देत प्रकल्पाचे नेमके स्थान, सध्याची बांधकाम स्थिती तसेच न्यायालयातील प्रकरणांची माहिती देण्यास सांगण्यात आले होते. या अनियमिततेबाबत पर्यावरणप्रेमी सुनील अग्रवाल यांनीही मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
मिस्त्री कन्स्ट्रक्शन कंपनीने सीआरझेडच्या 194 व्या बैठकीत आपला प्रस्तावच मागे घेतला आहे. प्रस्ताव मागे घेताना या प्रकल्पाच्या नियोजनात बदल झाल्याचे कारण देण्यात आले आहे. प्रकल्प प्रवर्तकाने महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाने त्यांच्या 193 व्या बैठकीत उपस्थित केलेल्या मुद्द्यांना उत्तर न देता सदर प्रस्तावच मागे घेतल्याने याबाबत उलटसुलट चर्चा नवी मुंबईत सुरु आहे. याबाबत पुर्ण खुलासा प्रकल्प प्रवर्तकाने करावा अशी मागणी जोर धरुन लागली आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai