अवैधरित्या वाहतुक होणारी 1000 किलो चांदी जप्त

नवी मुंबई : मुंबई वरून पुणेला जाणार्‍या टेम्पो मधून नवी मुंबई पोलिसांनी सुमारे 1000 किलो चांदी जप्त केली आहे. या चांदीची अवैधरित्या वाहतुक होत असताना पोलीसांना सापळा लावून सदर टेम्पो पकडला. यात 6 कोटी 17 लाखा 77 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. याप्रकरणी जीएसटी विभागामार्फत चौकशी सुरु आहे. 

मुंबईहून पुणे व पुण्याहून अहमदाबाद व इतर ठिकाणी एका टेम्पो मधून चांदीची वाहतूक होणार असल्याची माहिती उपायुक्त सुरेश मेंगडे यांच्या विशेष पथकाचे अधिकारी जी. डी. देवडे यांना मिळाली होती. त्यानुसार या पथकाने वाशी पोलिसांच्या मदतीने गुरुवारी पहाटे वाशी टोलनाका येथे सापळा रचला होता. यावेळी संशयास्पद टेम्पो अडवून त्यातील सामानाची चौकशी केली असता त्यामध्ये चांदीच्या विटा व बिस्किटे आढळून आली. त्यानुसार पोलिसांनी जीएसटी विभागाला कळवले. त्याअधिकार्‍यांनी मालाची पाहणी केली असता 929 किलो 414 ग्रॅम चांदी व इमिटेशन ज्वेलरी असा एकुण 6 कोटी 17 लाखा 77 हजार 418 रुपयांचा ऐवज मिळून आला. सदर चांदीचा ऐवज हा कुरियर सेवेच्या माध्यमातून पुणे, कोल्हापुर, व इतर ठिकाणी जी.एस.टी न भरता वाहतुक करत असल्याचे निष्पन्न झाले. सदरचा मुद्देमाल वस्तु व सेवाकर विभागाने इन्हेंंटरी पंचनामा करुन पोलीसांच्या ताब्यात दिले. सदर मुद्देमालाची वस्तु व सेवाकर विभाग यांचे मार्फत चौकशी करुन पुढील योग्य ती कार्यवाही करण्यात येणार आहे. सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक मेंगडे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. चांदीच्या अनेक वस्तू बिस्कीटं, पैंजण, साखळ्या असे दागिने सोबत सापडले आहेत.