गॅस काळाबाजारावर डिजिटल अंकुश

गॅस वितरीत करताना बुकिंग ओटीपी आवश्यक

नवी मुंबई: आगामी 1 नोव्हेंबरपासून घरगुती गॅस (एलपीजी) सिलेंडर वितरणासाठी सरकारने नवीन डिजिटल ओटीपी यंत्रणा राबविण्याचे ठरविले आहे. ग्राहकाने गॅस सिलेंडर बुक केल्यावर एक ओटीपी नंबर रजिस्टर मोबाईलवर पाठवला जाईल तो डिलिव्हरी करणार्‍याकडे मॅच झाल्यावर ग्राहकाला सिलेंडर मिळेल. या नव्या डिजिटल प्रणाली मुळे बाजारातील सिलेंडरच्या काळाबाजारावर अंकुश लागण्याची शक्यता आहे. 

सिलेंडर नोंदणीकृत ग्राहकालाच मिळावा ह्यासाठी केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाने गॅस सिलेंडर वितरण प्रणालीत यापुढे ओटीपी या डिजिटल प्रणालीचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार येत्या 1 नोव्हेंबरपासून याची प्राथमिक चाचणी काही शहरांत केली जाणार आहे. ग्राहकाने नोंदणीकृत मोबाईलमधून गॅस सिलेंडर बुकिंग केल्यानंतर लगेचच ग्राहकाला बुकिंग नंबर व एक ओटीपी पाठवला जाईल. सिलेंडर वितरण करणार्‍या कंपनीच्या माणसाकडे हाच ओटीपी असेल तो ग्राहकाकडे असलेला ओटीपी जुळूवुन पाहिल्यानंतरच त्या ग्राहकाला गॅस सिलेंडर दिला जाईल. ज्या ग्राहकांचा मोबाईल नंबर कंपनीकडे नोंद नसेल अशा ग्राहकांना आपला मोबाईल नंबर वितरण करणार्‍या व्यक्तीकडे असलेल्या कंपनी ऍप मार्फत नंबर रजिस्टर करता येईल. ओटीपी प्रणालीमुळे बाजारात होणारा सिलेंडचा काळाबाजार रोखला जाईल अशी खात्री पेट्रोलियम खात्याला वाटत आहे. ओटीपी डिजिटल प्रणालीमुळे रजिस्टर ग्राहकांनाही गॅस वितरण सुलभपणे होणार आहे. ज्या ग्राहकांनी अद्याप आपला मोबाईल नंबर कंपनीच्या वितरण एजन्सीकडे नोंद केला नसेल त्यांनी त्वरित आपली नोंदणी करून घ्यावी अन्यथा ओटीपी अभावी अशा ग्राहकांना सिलेंडर मिळणार नाही असे एलपीजी गॅस कंपन्यांनी सांगितले आहे. ही पद्धत व्यावसायिक सिलेंडर ग्राहकांना लागू होणार नाही.