नोव्हेंबरपासून नवी मुंबईत वॉटर टॅक्सी ?

नवी मुंबई ः रस्ते मार्गावरील होणारी वाहतुक कोंडी फोडण्यासाठी वेगवेगळे उपाय व योजना सुरु आहेत. यात जलवाहतुक, एलिव्हेटेड कॉरिडोअर यासारखे वाहतुकीचे मार्ग प्रस्तावित आहेत. आता मुंबई पोर्ट ट्रस्टतर्फे (एमपीटी) लवकरच मुंबईत वॉटर टॅक्सी सेवा सुरू करण्याचा विचार सुरू आहे. पहिल्या टप्प्यात मुंबईपासून बेलापूर, वाशी, जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी) आणि मांडवा या दरम्यान वॉटर टॅक्सी चालविण्याची योजना आहे. ही सेवा सुरू झाल्यास केवळ 30-40 मिनिटांत नवी मुंबई गाठणे शक्य होणार आहे.

नोव्हेंबरपासून माझगाव प्रिन्सेस डॉक येथील डोमेस्टिक क्रूझ टर्मिनलवरून (डीसीटी) वॉटर टॅक्सी सेवा सुरू करण्याचे मुंबई पोर्ट ट्रस्टचे नियोजन आहे. मुंबईतून बाहेर पडताना प्रचंड कोडीचा सामना करावा लागतो. केवळ शहराबाहेर पडायलाच प्रवाशांची 40-50 मिनिटे खर्ची पडतात. अशावेळी वॉटर टॅक्सीचा पर्याय मुंबईकरांसाठी अधिक परिणामकारक ठरेल, असे वाहतूकतज्ज्ञांचे मत आहे. यामुळे समुद्रमार्गे नवी मुंबईच्या कुठल्याही भागात अवघ्या 35-40 मिनिटांत पोहोचणे शक्य होणार आहे. यापूर्वी ‘एमपीटी’तर्फे मुंबई ते अलिबागदरम्यान रो-रो सेवा (जलवाहतूक) सुरू झाल्याने मांडवा, अलिबाग भागातील प्रवाशांना दिलासा मिळाला होता. ही सेवा पुरवणार्‍या ‘एम2एम फेरीज’ कंपनीने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार 5 हजार प्रवासी, 1200हून अधिक मोटारी, 270 दुचाकी, 16 सायकली तसेच 74 पाळीव प्राण्यांनी या सेवेचा लाभ घेतला आहे. या आकडेवारीतून जलप्रवासाला मिळणारा प्रतिसाद लक्षात घेत वॉटर टॅक्सीचा पर्याय पुढे आला आहे. या सेवेमुळे कुठल्याही थांब्याशिवाय थेट इच्छित स्थळी पोहोचण्याचा मार्ग सुकर होणार आहे.

ही सेवा पुरवण्यासाठी जवळपास सहा एजन्सी तयार असल्याची प्राथमिक माहिती आहे. यापैकी एक किंवा दोन ऑपरेटर लवकरच सेवा सुरू करण्याची शक्यता असून, या सेवेसाठीचे शुल्क ऑपरेटरद्वारे निश्‍चित केले जाईल, असे सांगण्यात येत आहे.