अण्णासाहेब पाटील महामंडळाचे कामकाज नियोजन विभागाकडे

मुंबई : अण्णासाहेब पाटील या आर्थिक मागास महामंडळाचे कामकाज कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागाकडून नियोजन खात्याकडे हस्तांतरीत करण्यात आले आहे. याबाबतचा निर्णय जुलै महिन्यात सारथी संस्थेच्या आढावा बैठकीत घेण्यात आला होता. 12 नोव्हेंबरला याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला. 

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने नेमणूक केलेल्या अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचा महामंडळाचे संचालक मंडळ बरखास्त करण्यात आले होते. यासाठी बुधवारी 4 नोव्हेंबरला आदेशही जारी करण्यात आला होता. त्यानंतर आता हे महामंडळ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नियोजन विभागाकडे सोपवले गेले आहे.

‘अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या आर्थिक आणि प्रशासकीय बाबींवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागाऐवजी नियोजन विभागाकडे देण्याचा निर्णय 9 जुलै 2020 रोजी सारथी संस्थेच्या बैठकीत घेण्यात आला होता. यानंतर हे महामंडळ कौशल्य विकास आणि उद्योजकता विभागाकडून हस्तांतरित करण्याची प्रक्रिया सुरु होती. अखेर ही सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता अण्णासाहेब पाटील महामंडळाचा संपूर्ण कारभार सर्व योजनांसह कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागाकडून नियोजन विभागाकडे वर्ग करण्यात आला आहे.

यानुसार याविषयीचे सर्व प्रस्ताव सादर झाल्यानंतर ते या विभागाकडून वितरीत करण्यात येतील. मात्र नियोजन विभागाने यासाठी तात्काळ स्वतंत्र लेखाशिर्ष उपलब्ध करुन घ्यावे. विविध तरतुदी करण्यासाठी लेखाशिर्ष घेणे, त्यासाठी आवश्यक अर्थसंकल्पीय तरतूद करणे, पुरवणी मागणी करणे, निधी वितरीत करणे या अन्य बाबी यापुढे नियोजन विभागाने हाताळाव्यात.’ असे या शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे.