अपहार केलेली 68 वाहने मुळ मालकांना परत

चौकडी जेरबंद ; महिनाभरात तपास ; आयुक्तांकडून पोलिसांचा गौरव

नवी मुंबई : गाडी भाड्याने लाऊन देतो असे सांगून वाहने परस्पर दुसर्‍याला विकल्याचे प्रकरण नुकतेच समोर आले होते. या प्रकरणात पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे. 3 कोटी 7 लाख 80 हजार रुपयांच्या 68 गाड्या हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे. ही वाहने ज्यांना विकली त्यांच्याकडून जप्त करीत ती वाहनमालकांना परत केली. या कामगिरीबद्दल नवी मुंबई पोलीस आयुक्तांनी या पोलीस पथकातील कर्मचार्‍यांचा ‘सर्वोकृष्ट मालमत्ता हस्तगत’ प्रशतीपत्रक देऊन सत्कार केला.

 ऑक्टोबर 2019 मध्ये पनवेल शहर पोलीस ठाणेअंतर्गत याबाबत एक तक्रार दाखल झाली होती. त्यानुसार या गाडी मालकाला त्याची गाडी दरमहा भाड्याने देतो सांगून ताब्यात घेतली. काही महिने वेळेवर भाडे दिले. मात्र त्यानंतर भाडे देण्यास टाळाटाळ केली. नंतर भाडेही देत नाही आणि गाडीही देत नाही असे आरोपींकडून सांगण्यात आले. याबाबत तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी केलेल्या तपासात याप्रमाणेच पाच ते सहा तक्रारी असल्याचे समोर आले. पोलिसांना या प्रकरणाचा आंदाज आल्यानंतर पुढील तपास करीत आरोपी सतीश म्हसकर (32) याला त्याच्या पनवेल येथील कार्यालयातून अटक करण्यात आली. चौकशीतून या गुन्ह्यातील अन्य आरोपी शाहरुख बेग, चेतन ठाणगे आणि प्रियेश कणगी यांचे नावे समोर आली. शाहरुख आणि चेतन यांना पनवेल येथून तर प्रियेश याला कोंढवा, पुणे येथून अटक करण्यात आली. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार सलग दीड महिना अथक प्रयत्न करीत 3 कोटी 7 लाख 80 हजार किमंतीच्या वेगवेगळ्या कंपनीची 68 वाहने नवी मुंबई, मुंबई, पोण अलिबाग व रायगड परिसरातून पोलिसांनी जप्त केली. ती वाहने मूळ मालकांना परत करण्यात आली आहेत. या पोलीस पथकात पोलीस उपनिरीक्षक सुनील तारमाळे, पोलीस हवालदार रवींद्र राऊत, विजय आयरे पोलीस शिपाई यादवराव घुले यांचा समावेश होता.

जप्त वाहने
स्कार्पिओ : 12
एर्टिगा  : 23
झायलो  :4
इनोव्हा,एक्सेंन्ट कार,  निसास सनि, होंडा अ‍ॅमेझा, आर्या, रिट्झ ः प्रत्येकी 1
वॅगनआर : 3 ,
स्विफ्ट डिझायर : 7
ट्युयुव्ही  : 6
ब्रिझा  : 2
सेलोरो  : 5
एकूण  :  68