घणसोलीत इमारतीला आग

10-12 दुचाकी जळून खाक

नवी मुंबई : घणसोली गावातील 5 मजली इमारतीला आग लागल्याची घटना बुधवारी पहाटे घडली. या आगीत 10 ते 12 मोटर सायकल जळून खाक झाल्या आहेत. सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, हा घातपात असल्याचा संशय रहिवाशांनी व्यक्त केला आहे.

नवी मुंबईतील घणसोली गावातील बेकरी मागे असलेल्या अंकल स्मृती अपार्टमेंट या पाच मजली इमारतीला बुधवारी पहाटे 3 वाजून 15 मिनिटांनी या इमारतीच्या तळमजल्यावर मोटारसायकल पार्किंगच्या ठिकाणी अचानक आग लागली. या आगीत इमारतीच्या पहिल्या, दुसर्‍या मजल्यावरील फ्लॅटचे मोठे नुकसान झाले आहे. यात तळमजल्यावर पार्किंगध्ये उभ्या असलेल्या 10 ते 12 मोटारसायकल जळून खाक झाल्या आहेत. परिसरातील नागरिक तसेच अग्निशमन दलाच्या जवानांच्या मदतकार्यामुळे आग नियंत्रणात आणण्यात आली असून आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. काही समाजकंटकानी जाणीवपूर्वक के कृत्य केले असावे असा संशय व्यक्त केला जात आहे. इमारतीच्या दुसर्‍या मजल्यापर्यंत या आगीची झळ पोहोचली. येथील काही फ्लॅटचे व वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.