नियमांचे उल्लंघन करणार्‍यांवर कारवाई

11 हजार 800 जणांकडून 61 लाख दंडवसूल

नवी मुंबई : कोरोनापासून बचाव व्हावा व त्याचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी मुखपट्टीचा वापर, सुरक्षित अंतर आणि नियमित हात धुणे या त्रिसुत्रीचा वापर करणे गरजेचे आहे. मात्र काही जणांकडून या नियमाला हरताळ फसला जात आहे. नियमाचे उल्लंघन करणार्‍या 11 हजार 800 जणांवर कारवाई करण्यात आली असून 61 लाख 34 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. 

नियमांचे उल्लंघन करणार्‍या नागरिकांना समज मिळावी ही या कारवाईची भूमिका असली तरी अद्याप नियमांचे पालन होताना दिसत नाही. आठही विभाग कार्यालयांत नियमांचे पालन न करणार्‍यांवर कारवाईसाठी स्वतंत्र विशेष भरारी पथके नेमण्यात आली आहेत. विभाग कार्यालयांतील दक्षता पथकाबरोबर 8 विभाग कार्यालयनिहाय 8 विशेष भरारी पथके कारवाई करीत आहेत. या पथकात पालिकेच्या दोन कर्मचार्‍यांसह दोन पोलीसही आहेत. आतापर्यंत 11 हजार 800 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. यात बेलापूर विभागात 2129 जणांवर शहरात सर्वाधिक कारवाई झाली आहे. दिघामध्ये सर्वात कमी 763 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. मुखपट्टी न वापरणार्‍या 6,255 जणांवर कारवाई करून 31 लाख 34 हजार 100 रुपये दंडवसुली तर सामाजिक अंतर न पाळणार्‍या 848 दुकाने आणि 4553 नागरिकांवर कारवाई करीत 20 लाख 13 हजार 200 रुपये, तर रस्त्यावर थुंकणार्‍या 32 जणांवर कारवाई करून 30 हजार 450 रुपये दंड वसूल केला आहे.