नियम मोडणार्‍या 33 खासगी बसेसवर आरटीओची कारवाई

नवी मुंबई : वाहतुकिच्या नियमांचे उल्लंघन करणार्‍या खाजगी बस चालकांविरोधात नवी मुंबई उप प्रादेशिक परिवहन विभागाने बडगा उगारला आहे. नवी मुंबई आरटीओने या महिन्याभरामध्ये अवैधरित्या प्रवाशी बसमधून माल वाहतुक करुन वाहतुकिच्या नियमांचे उल्लंघन करणार्‍या 33 खाजगी बसेसवर कारवाई केली आहे. तसेच त्यांच्याकडून सुमारे 40 हजार रुपये इतका दंड वसूल केला आहे. यात खासगी बस मधून क्षमतेपेक्षा जास्त मालाची वाहतुक करणारे, अवैधरित्या ड्रायव्हरच्या केबिनमध्ये प्रवाशी अथवा मालाची वाहतुक करणाऱयांचा समावेश आहे. आरटीओने खाजगी बसेस विरोधात सुरु केलेल्या या कारवाईमुळे खाजगी ट्रव्हेल्स बस चालकांचे धाबे दणाणले आहेत. 

मुंबई, नवी मुंबई मधून पुणे, मराठवाडा, लातूर, कोकण, कोल्हापूर, सातारा, त्याचप्रमाणे हैद्राबाद, कर्नाटक, गुजरात, गोवा, मध्यप्रदेश, बंगळूरसह इतर ठिकाणी जाण्यासाठी खासगी ट्रव्हेल्स कंपन्यांकडून बसेस चालविल्या जातात. खाजगी ट्रव्हल्स बस चालक मालक हे पैश्यांचा लोभापायी या बसेसमध्ये प्रवाशांसोबतच अवैधपणे इतर कंपन्यांचा माल व साहित्य ठेवून धोकादायकरित्या वाहतुक करतात. या बसेसमधुन वाहुन केल्या जाणाऱया माल वाहतुकिचे वजन साधारपणे चार टन इतके असल्यामुळे बसचे क्षमतेपेक्षा जास्त वजन होऊन सदर बसचा अपघात होण्याची दाट शक्यता असते. दुर्घटना टाळण्यासाठी नवी मुंबई आरटीओ विभागाकडून अशा खाजगी बस चालकांवर नियमित कारवाई करण्यात येत असते. मात्र त्यानंतर देखील हे बस चालक व मालक छुप्या पद्धतीने बसच्या डिकीमध्ये व टपावरुन माल वाहतुक करत असतात. त्यामुळे नवी मुंबई आरटीओने अशा बस चालकांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. सानपाडा येथे बसला आग लागून झालेल्या दुर्घटनेनंतर नवी मुंबई आरटीओचे मोटार वाहन निरीक्षक प्रशांत शिंदे व रमेश कल्लूरकर यांनी वाशी, सानपाडा, जुईनगर, रबाळे, नेरुळ येथे खासगी बसेसची तपासणी केली. या तपासणीत पंधरा बसेसमध्ये क्षमतेपेक्षा जादा साहित्य ठेवल्याचे तर काही बसमध्ये अवैधरित्या प्रवाशी वाहतुक केले जात असल्याचे आढळुन आले. या सर्व बसेसवर नियमानुसार आरटीओकडून कारवाई करण्यात येऊन त्यांच्यावर दंड वसूल करण्यात आला.  

नवी मुंबई आरटीओकडून या नोव्हेंबर महिन्यांमध्ये वाहतुकिच्या नियमांचे उल्लंघन करणाऱया एकुण 33 खाजगी बसेसवर कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून 40  हजारांचा दंड वसूल करण्यात आल्याची माहिती नवी मुंबईच्या उपप्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगीनी पाटील यांनी सांगितले. या पुढे देखील हि कारवाई अशाच पद्धतीने सुरु राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.