समाजमंदिराच्या खोदकामात मृतदेह

नवी मुंबई : वाशी पोलिसठाण्यालगत समाजमंदिर उभारण्याचे बांधकाम सुरु आहे. येथे खोदलेल्या खड्ड्यात सोमवारी संध्याकाळी एक मृतदेह आढळून आला. मृत व्यक्तीची ओळख पटलेली नसून, हि हत्या आहे कि आत्महत्या याबाबत पोलीस तपास करत आहेत. 

वाशी सेक्टर 3 येथे पालिकेच्या वतीने चार मजली समाजमंदिर बांधण्याचे काम सुरु आहे. वाशी पोलिसठाण्याला लागूनच हि इमारत आहे. सोमवारी संध्याकाळी त्याठिकाणी एक मृतदेह आढळून आला. इमारतीच्या तळमजल्यावरून दुर्गंधी येत असल्याचे कामगारांनी पोलिसांना कळवले होते. यावरून तिथे पाहणी केली असता कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला. लिफ्टसाठी बनवलेल्या जागेच्या ठिकाणी तळाशी खड्ड्यात हा मृतदेह पडलेला होता. ही माहिती पोलिसांना देण्यात आल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मात्र मृतदेह खोल खड्डयात असल्याने अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. परंतु मृत व्यक्ती तिथल्या कामगारांपैकी कोणी नसल्याचे चौकशीत समोर आले आहे. या ठिकाणी 24 तास सुरक्षा रक्षक असतात, तरीही बाहेरील मृतदेह आला कसा हा प्रश्न उपस्थित होत असून कोणीतरी मृतदेह आणून टाकल्याचा दावा पालिका करीत आहे. या ठिकाणी सीसीटीव्ही नसून संध्याकाळी काम सुरू असेल तरच दिवे लावले जातात. अन्यथा काळोख असतो.  मृत व्यक्तीची ओळख पटलेली नाही. बांधकामाच्या ठिकाणी कामगार व सुरक्षा रक्षक असतानाही अज्ञात व्यक्ती त्याठिकाणी आली कशी याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. तसेच सदर व्यक्तीचा मृत्यू अपघाती आहे कि हत्या ? याचाही उलगडा झालेला नाही. पोलिसांनी सदर मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. याप्रकरणी वाशी पोलीस अधिक तपास करत आहेत.