728 वीजचोरांवर कारवाई

1 कोटी 85 लाखाची वीजचोरी उघड

नवी मुंबई : वीजचोरीवर आळा घालण्यासाठी तसेच प्रामाणिक ग्राहकांना वीजचोरांमुळे होणारा त्रास कमी करण्यासाठी  महावितरणच्या भांडूप परिमंडलचे मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांच्या मार्गदर्शनाखाली, भांडूप परिमंडलात नोव्हेंबर 2020 पासून वीजचोरांविरुद्ध धडक मोहीम राबविण्यात आली आहे. या मोहिमेत, नोव्हेंबर महिन्यात 728 वीजचोरांवर कारवाई करून जवळपास  1 कोटी 85 लाखाची वीजचोरी पकडण्यात आली आहे. 

भांडूप परिमंडलात येत असलेल्या ठाणे, वाशी व पेण या मंडळ कार्यालयांतर्गत गेल्या                         महिनाभरापासून वीजचोरांविरुद्ध धडक मोहीम सुरु आहे. ही मोहीम अधिक तीव्र करण्याच्या सूचना भांडूप परिमंडलचे मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांनी दिले होते. या मोहिमेला गती देण्यात आली आहे. मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांनी स्वतः जाऊन वीजचोरांविरुद्ध कारवाई करून या मोहिमेला हिरवा कंदील दाखवला. त्यानुसार भांडूप अंतर्गत ठाणे, वाशी व पेण मंडळात; अधीक्षक अभियंता ठाणे अरविंद बुलबुले, अधीक्षक अभियंता वाशी राजाराम माने व अधीक्षक अभियंता पेण श्री. दीपक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व कार्यकारी अभियंता, शाखा अभियंता तसेच लाईन स्टाफ ने वीजचोरीवर आळा घालण्यासाठी निश्चय केला. तसेच मोहिमेबाबतची सद्यस्थितीबद्दल नियमितपणे पाठपुरावा करत आहेत. या मोहिमेत भांडूप परिमंडलात 1 नोव्हेंबरपासून 728 जणांची वीजचोरी उघडकीस आली आहे. त्यातील 418 वीजचोरांविरुद्ध वीज कायदा-2003 च्या कलम 135 नुसार कारवाई करण्यात येत आहे तर 310 जणांविरुद्ध कलम 126 नुसार कारवाई करण्यात येत आहे. यामध्ये अनेक ठिकाणी मीटरशी छेडछाड करणे किंवा मीटर बायपास करणे तसेच वीजतारांवर थेट आकडे टाकून वीजचोरी करणे असे प्रकार आढळून आले आहेत. 

1 नोव्हेंबर पासून उघड झालेल्या वीजचोरींमध्ये कलम 135 नुसार जवळपास 906643 युनिट्सची वीजचोरी भांडूप नागरी परीमंडळात उघडकीस आली आहे. यामध्ये ठाणे मंडळात 14  प्रकरणात 11,802  युनिटची रु. 7.24  लाखाची, वाशी मंडळात 311  प्रकरणात 66,35,62 युनिटची रु. 102.44  लाखाची व पेण मंडळात 93  प्रकरणात 2,31,279 युनिटची रु. 24.34  लाखाची वीजचोरी पकडण्यात आली आहे. याशिवाय, कलम 126 नुसार कारवाई करून ठाणे मंडळात 205 प्रकरणात रु 19.68 लाखाची, वाशी मंडळात 95 प्रकरणात रु 26.73 लाखाची तर पेण मंडळात 10 प्रकरणात रु.4.80 लाखाची वीजचोरी पकडण्यात आली आहे.

रिमोटद्वारे वीजचोरी

मीटरशी छेडछाड करणे किंवा मीटर बायपास करणे तसेच वीजतारांवर थेट आकडे टाकून वीजचोरी करणे या व्यतिरिक्त आता स्मार्ट फोन च्या काळात वीजचोर ही स्मार्ट झाले आहेत. कायदेशीर वीजजोडणी घेणारे ग्राहकसुद्धा वीज बिल कमी यावे म्हणून मीटरमध्ये फेरफार करून रिमोटचा वापर करून विजेची चोरी करत असल्याचे निदर्शनास आले आहेत.