मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून फी घेतल्यास प्राचार्यांवर गुन्हा दाखल होणार

समाजकल्याण विभागाच्या बैठकीत प्रादेशिक उपायुक्त यांचा इशारा

नवी मुंबई : महाविद्यालयात शिकणार्‍या प्रत्येक मागासवर्गीय विद्यार्थ्याला शिष्यवृत्तीचा लाभ मिळाला पाहिजे. कोणताही विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहू नये यासाठी महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी विशेष प्रयत्न करावेत, अशी सूचना कोकण भवन येथील समाजकल्याण विभागाच्या प्रादेशिक उपायुक्त वंदना कोचुरे यांनी मुंबई विभागातील महाविद्यालयीन प्राचार्यांच्या बैठकीत केली. तसेच शिष्यवृत्तीसाठी पात्र असलेल्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून फी आकारल्यास संबंधित महाविद्यालयांच्या प्राचार्यावर गुन्हा दाखल करण्यात येईल असा इशारा देखील कोचुरे यांनी दिला.  

समाजकल्याण विभागाच्या वतीने मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती संदर्भात नुकतेच मुंबई विभागातील मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिह्यातील महाविद्यालयांचे प्राचार्य व संबंधित जिह्यातील समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त यांची व्हीडीओ कॉन्फरान्सिंगच्या माध्यमातून ऑनलाईन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत सहभागी प्राचार्य व अधिकार्‍यांना मार्गदर्शन करताना वंदना कोचुरे यांनी, कोणताही विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहू नये यासाठी महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी विशेष प्रयत्न करावेत अशा सक्त सुचना दिल्या.  

महाविद्यालयीन स्तरावर विद्यार्थ्यांचे जे अर्ज त्रुटी पुर्ततेसाठी प्रलंबित आहेत, अथवा ज्या विद्यार्थ्यांच्या अर्जांमध्ये कागदपत्रे अपुरी आहेत, अशा विद्यार्थ्याला त्रुटी पुर्ततेसाठी व्हॉटस्अप ईमेलद्वारे संपर्क साधून त्रुटी पुर्तता पुर्ण करुन घेण्यात यावेत, यासाठी संबंधित महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी प्रयत्न करण्याच्या सुचना देखील उपायुक्त कोचुरे यांनी यावेळी केल्या. तसेच शिष्यवृत्तीसाठी पात्र असलेल्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून कोणत्याही प्रकारची फी आकारु नये, विद्यार्थ्यांकडून फी आकारल्यास संबंधित महाविद्यालयांच्या प्राचार्यावर गुन्हा दाखल करण्यात येईल असा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला.  यावेळी महाविद्यालयीन स्तरावर शिष्यवृत्ती संदर्भात येणाऱया अडीअडचणींवर चर्चा करण्यात आली. या बैठकीत मुंबई विभागातील सुमारे 350 हून अधिक महाविद्यालयाचे प्राचार्य व संबंधित जिह्याचे समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त सहभागी झाले होते.