आरोग्य क्षेत्रात पल्स मुळे महाराष्ट्राचा लौकिक वाढणार
- by Aajchi Navi Mumbai
- Mar 07, 2026
- 24
मुंबईत 27 व 28 मार्च रोजी वैद्यकीय परिषद पल्सचे आयोजन
मुंबई : सध्या जगामध्ये प्रत्येक क्षेत्रात तंत्रज्ञानाची प्रगती होत आहे. आरोग्य क्षेत्रातही दररोज नवनवे तंत्रज्ञान येत आहे. नवनवीन संशोधन, येणारे तंत्रज्ञान, दुर्धर आजारावरील परवडणारे उपचार आणि आजारांना प्रतिबंध या सर्वांचा संगम मुंबईत आयोजित ‘पल्स’ परिषदेत होणार आहे. त्यामुळे निश्चितच आरोग्य क्षेत्रात जगात महाराष्ट्राचा लौकिक वाढणार आहे, असल्याचा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
पल्स या वैद्यकीय परिषदेचे आयोजन मुंबईत जिओ वर्ल्ड सेंटर, येथे 27 व 28 मार्च 2026 रोजी करण्यात येणार आहे. पल्स 2026 च्या कर्टन रेझर कार्यक्रम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत विधानभवन येथे पार पडला. यावेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ उपस्थित होत्या. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, मानवी आरोग्यासाठी निर्माण होणाऱ्या नवनवीन आव्हानांवर यशस्वी मात करण्यासाठी राज्य शासन कार्यरत आहे. सध्या शासन, खाजगी आणि सार्वजनिक क्षेत्राने सोबत येऊन यावर उपाय काढण्याची आवश्यकता असून खासगी क्षेत्राने संशोधनातून अशा समस्यांवर उपाय काढावे, असे आवाहनही त्यांनी केले. या परिषदेच्या आयोजनातून जागतिक स्तरावर असणाऱ्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आरोग्य क्षेत्रात मोठे सकारात्मक बदल होतील. आपल्या संपूर्ण आरोग्य यंत्रणेला सक्षम करण्यासाठी पल्स परिषद ही मोठी संधी आहे. परिषदेकरिता जगभरातून जवळपास 130 नामांकित डॉक्टर्स, वैद्यकीय शिक्षण देणाऱ्या संस्थांमधील अभ्यासक, संशोधक येणार आहेत. सध्या असलेली युद्धजन्य परिस्थिती तोपर्यंत निवळून जाईल आणि विनासायास तज्ज्ञ परिषदेला येऊ शकतील. जर ही परिस्थिती कायम राहिली, तर तंत्रज्ञानाच्या माध्यमातून त्यांना परिषदेत सहभागी करून घेतल्या जाईल. परिषदेत 20 सत्रांच्या माध्यमातून आरोग्य क्षेत्रातील संशोधन, नवनवीन तंत्रज्ञान, परवडणाऱ्या खर्चात मिळू शकणारे उपचार, दुर्धर आजारांवरील उपचार याविषयी चर्चा होणार आहेत, असेही मुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले.
कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानामुळे संपूर्ण आरोग्य क्षेत्राचा कायापालट होत आहे. या तंत्रज्ञानामुळे दिवसेंदिवस आरोग्य क्षेत्रात बदल होत आहेत. परिषदेच्या यशस्वी आयोजनानंतर पुढील प्रत्येक वर्षी परिषद आयोजित व्हावी. या परिषदेच्या आयोजनातून आरोग्य यंत्रणेला निश्चितच बळकट करण्याचे कार्य होईल, अशी अपेक्षाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केली. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, परिषदेच्या माध्यमातून आरोग्य व वैद्यकीय शिक्षण क्षेत्रातील नवोन्मेष, संशोधन पुढे येईल. या क्षेत्रात नवनवीन संकल्पना, कार्य करणाऱ्या स्टार्टअप्सलाही परिषदेत या व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. जगभरातून उद्योग क्षेत्रात कार्यरत असलेले तज्ञ, अभ्यासक, संशोधक परिषदेत येणार आहेत त्यामुळे आपल्या आरोग्यवस्थेचा पाया अधिक बळकट करणे शक्य होणार आहे.
वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ म्हणाल्या, मुंबईत होणारी ही परिषद आरोग्य, वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात मोठ्या संधी उपलब्ध करून देणार आहे. या संधीचा उपयोग राज्यातील दुर्गम, अती दुर्गम भागात दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी होणार आहे. ही परिषद राज्याच्या आरोग्य, वैद्यकीय शिक्षण क्षेत्राचे भविष्यातील मार्गक्रमण अधोरेखित करणारी ठरणार आहे. मुख्यमंत्री यांच्या सल्लागार पूजा मिसाळ यांनी कार्यक्रमात सादरीकरण करीत परिषदेच्या आयोजनामागील भूमिका विषद केली. कार्यक्रमादरम्यान परिषदेवर आधारित चित्रफीत दाखविण्यात आली. तसेच कार्यक्रमासाठी निर्मित संकेतस्थळाची माहिती देण्यात आली. परिषदेच्या माहितीवर आधारित साहित्याचे प्रकाशनही करण्यात आले. यावेळी वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव धीरज कुमार, आयुक्त अनिल भंडारी, अभिनेत्री सोहा अली खान, वैद्यक मुफझ्झल लकडवाला, स्वप्नाली कदम, रिलायन्स रुग्णालय समूह तसेच लीलावती रुग्णालयाचे डॉक्टर उपस्थित होते.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai