मुंबईसह चार उपनगरांतील हवेतील प्रदुषण वाढले

मुंबई : मार्च, एप्रिल व मे महिन्यात शुन्यावर आलेले हवेतील प्रदूषण ऑक्टोबरनंतर कैक पटीने वाढले आहे. बुधवारी सफर संस्थेकडून वांद्रे कुर्ला संकुल, अंधेरी, बोरिवली व नवी मुंबई ही चार ठिकाणे प्रदूषित नोंदविण्यात आली आहेत. येत्या काही दिवसात यामध्ये वाढ होण्याचे संकेत मिळाले आहेत. या सगळ्या परिस्थितीमुळे मुंबई आणि उपनगरांमधील लोकांच्या श्वसनयंत्रणेवर परिणाम होत आहे.

मुंबईलगतच्या भागातून म्हणजेच रायगड, पालघर, नवी मुंबई, ठाणे कल्याण डोंबिवली इथून लॉकडाऊन संपल्यानंतर नागरिकांनी रेल्वे (लोकल ) वाहतूक सर्वांसाठी खुली नसल्यामुळे अनेकांनी दुचाकी व चारचाकी वाहनांचा वापर सुरु केला. यामुळे मुंबई व लगतच्या महामार्गावर वाहतूककोंडी झाल्यामुळे हवेतील प्रदूषणात वाढ झाली आहे. घरांपासून कामाच्या ठिकाणांचे अंतर वाढलेले असल्यामुळे गरज म्हणून वाहन संख्या वाढत चालली आहे. त्यातल्या त्यात किफायतशीर साधन म्हणून डिझेलच्या वाहनांना मोठी मागणी आहे.

सध्या मुंबईतील सर्वच रस्ते गाड्यांच्या वर्दळीचे झाले असल्यामुळे गाडीतून निघालेल्या धुरामुळे कार्बन मोनॉक्साइडचे प्रमाण वाढीस लागले आहे. नवी मुंबई, ठाणे रायगड इथे सुरु असलेल्या रस्त्यांच्या कामामुळे धुळीचे साम्राज्य आहे, धुळीमुळे सीओपीडी, आयएलडी व दमा असे श्वसन विकार बळावत आहेत. याविषयी अधिक माहिती देताना छाती रोग व फुप्फुसरोगतज्ञ डॉ अभय उप्पे म्हणाले की, मुंबईत व लगतच्या शहरांमध्ये अनेक औद्योगिक वसाहती (एमआयडीसी)असल्यामुळे इथून निर्माण होणारे कोळसा ज्वलन, विविध प्रकारच्या वायू जलनामुळे वायू प्रदूषण होत असते व त्याचसोबत गेल्या तीन महिन्यांमध्ये डिझेल व पेट्रोल गाडीच्या अतिवापरामुळे व डिसेंबर महिन्यात थंडीमुळे आलेले धुके याचा एकत्रित परिणाम दिसून येत आहे.