सिडको भवन येथे रक्तदान शिबिर संपन्न

161 अधिकारी व कर्मचार्‍यांनी केले रक्तदान  

नवी मुंबई ः राज्यामध्ये निर्माण झालेला रक्ताचा तुटवडा लक्षात घेता मुख्यमंत्री उद्धव ठाकर व आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या आवाहनास प्रतिसाद देत डॉ. संजय मुखर्जी, उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक यांच्या अध्यक्षतेखाली व सिडको कर्मचारी संघटनेच्या सहभागाने सिडकोमध्ये 21 डिसेंबर 2020 रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कोविड - 19 संदर्भातील सर्व नियमांचे पालन करून हे रक्तदान शिबिर पार पडले. या शिबिराच्या माध्यमातून 161 अधिकारी व कर्मचार्‍यांनी उत्स्फुर्तपणे रक्तदान केले. 

सदर रक्तदान शिबिर जे. जे. रूग्णालय रक्तपेढीच्या सहकार्याने आयोजित करण्यात आले होते. सध्याच्या कोविड-19 च्या कठिण काळात रक्ताचा निर्माण झालेला तुटवडा भरून काढण्यासाठी सिडकोतर्फे लावलेला हा छोटासा हातभार आहे. लवकरच रक्तदान शिबिराप्रमाणेच प्लाझ्मा डोनेशनचे शिबिरदेखील आयोजित करण्याचा सिडकोचा मानस आहे, असे उद्गार या प्रसंगी उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक यांनी काढले.