फास्टॅगला 15 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ

मुंबई ः केंद्र सरकारनं जुन्या आणि नव्या सर्वच गाड्यांना आता फास्टॅग अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला आहे. 1 जानेवारी 2021 पासून देशभरात हा नियम लागू होणार होता. परंतु आता सरकारनं वाहनचालकांना दिलासा देत फास्टॅगसाठी मुदतवाढ दिली आहे. सरकारनं ही मुदत आता 15 फेब्रुवारी 2021 पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. 

केंद्रीय रस्ते आणि परिवहन मंत्रालयानं सर्व जुन्या गाड्यांनाही फास्टॅग लावणं बंधनकारक केलं आहे. तर दुसरीकडे छकअख नंदेखील 1 जानेवारीपासून रोख रकमेद्वारे टोल वसूली बंद केली जाणार असल्याचं म्हटलं होतं. फास्टॅगला मुदतवाढ मिळाल्यामुळे तुर्तास तरी रोख टोल वसूली बंद होण्याची शक्यता नाही. सध्याच्या काळात फास्टॅग द्वारे 75 ते 80 टक्के टोलवसूली केली जाते.

हायवे ऑथोरिटी 15 फेब्रुवारीपासून 100 टक्के कॅसलेस टोलवसूलीसाठी आवश्यक ते नियम तयार करू शकते असं एनएचएआयशी झालेल्या चर्चेदरम्यान मंत्रालयानं सांगितलं. टोल नाक्यांवरील गाड्यांच्या रांगा कमी करण्यासाठी तसंच डिजिटल ट्रान्झॅक्शनला चालना देण्यासाठी फास्टॅगचा वापर वाढवण्याच्या सूचना करण्यात येत आहेत. फास्टॅग नसलेल्या गाड्यांनी या लेनमध्ये प्रवेश केल्यास त्यांच्याकडून मूळ टोलच्या रकमेच्या दुप्पट टोल वसूल करण्यात येईल.