बेकायदेशीर पिस्तुल बाळगणार्‍या तरुणाला अटक

देशी बनावटीचे पिस्तुल व दोन जिवंत काडतुसे जप्त  

नवी मुंबई : वाशीतील रघुलीला मॉल जवळ बेकायदेशीर देशी बनावटीचे पिस्तुल विक्रीसाठी आलेल्या तरुणाला वाशी पोलिसांनी सापळा लावुन अटक केली आहे. अमितकुमार अशोक झा (27) असे या तरुणाचे नाव असून पोलिसांनी त्याच्या जवळ असलेले देशी बनावटीचे पिस्तूल तसेच दोन जिवंत काडतूसे जप्त केली आहेत. या तरुणाने सदरचे पिस्तुल कुठून व कुणाला विक्री करण्यासाठी आणले याबाबत अधिक चौकशी सुरु असल्याची माहिती परिमंडळ-1चे पोलीस उपआयुक्त सुरेश मेंगडे यांनी दिली.  

वाशीतील रघुलीला मॉल जवळ एक व्यक्ती बेकायदेशी अग्नीशस्र विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजिव धुमाळ यांना मिळाली होती. त्यानुसार वाशी पोलिसांनी गत सोमवारी दुपारी वाशीतील रघुलीला मॉल जवळ सापळा लावला होता. सदर ठिकाणी पावणे तीन वाजण्याच्या सुमारास एक संशयीत तरुण बस डेपोच्या दिशेने जाताना निदर्शनास आल्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे देण्यास सुरुवात केली. पोलिसांनी त्याची झडती घेतली असता, त्याच्या कंबरेला डाव्या बाजुला पॅन्टच्या आतमध्ये देशी बनावटीचे पिस्तूल खोचलेले आढळुन आले. तसेच त्याच्या पॅन्टच्या उजव्या खिशात दोन जिवंत काडतूस देखील सापडले. त्यामुळे पोलिसांनी पिस्तुल बाबत त्याच्याकडे चौकशी केली असता, तो कोणतेही सबाळ कारण देऊ शकला नाही. त्यामुळे पोलिसांनी त्याच्याजवळ सापडलेले पिस्तुल, काडतुसे, मोबाईल फोन व रोख रक्कम जप्त केले.  

त्यानंतर त्याच्यावर बेकायेशीर अग्निशस्र बाळगल्याप्रकरणी तसेच भारतीय हत्यार कायद्यानुसार गुन्हा दाखल करुन त्याला अटक करण्यात आल्याची माहिती पोलीस उपआयुक्त सुरेश मेंगडे यांनी दिली. सदर आरोपी कळंबोलीतील रोडपाली भागात राहाण्यास आहे. या आरोपीने सदरचे पिस्तुल आणि काडतुसे कुठून व कुणाला देण्यासाठी आणले, याबाबत अधिक तपास सुरु असल्याचेही मेंगडे यांनी सांगितले.